महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात मोहोर उमटवण्यात यशस्वी झालेल्या ‘ओली की सुकी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
आयुष्यात येणाऱ्या अनपेक्षित वळणाला ‘विषय गंभीर तिथं खंबीर’ होत सामोरे जाणाऱ्या स्टायलिश ‘रावडी गँगची’ हजरजवाबी बोलबच्चनगिरी या ट्रेलरमधून अनुभवायला मिळते. आयुष्याची नवीन सुरुवात करायला कधीच उशीर होत नाही म्हणणारी ही ‘रावडी गँग’ हसत खेळत आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन अतिशय मनोरंजक पद्धतीने या चित्रपटातून देणार आहे याची खात्री ट्रेलर बघून होत आहे.
ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या प्रत्येक संकटाला आत्मविश्वासपूर्वक परतवून लावण्याची भाषा बोलणारी अतरंगी मुले, अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची त्यांच्याप्रती असणारी तळमळ यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढत आहे. तेजश्री प्रधानसह या चित्रपटात वर्षा उसगावकर, भार्गवी चिरमुले, संजय खापरे, शर्वरी लोहोकरे, सुहास शिरसाट, बालकलाकार चिन्मय संत आणि १० ते १२ बालकलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आनंद गोखले लिखित व दिग्दर्शित आणि वैभव जोशी निर्मित ओली की सुकी हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा पोस्टर ही प्रदर्शित करण्यात आला होता. समाजात जगताना सगळेच कधी स्वतःच्या मर्जीने तर कधी परिस्थितीमुळे मुखवटे चढवून जगत असतात. पण कधीतरी आयुष्याला कलाटणी देणारी व्यक्ती येते आणि आपले अवघे आयुष्यच बदलून जाते. ‘ओली की सुकी’ चित्रपटातील वस्तीत राहणाऱ्या मुलांच्या बाबतीत कदाचित असेच काहीतरी घडले असावे. निर्माते वैभव उत्तमराव जोशी यांच्या नलिनोत्तम प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘जिंदगीला नडणारे आवडतात, रडणारे नाय!’ असे म्हणणाऱ्या या चित्रपटात समाजाने वाया गेलेली मुलं असा शिक्का लावलेल्या मुलांवर भाष्य करण्यात आले आहे.