छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘अग्गंबाई सासूबाई.’ अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या मालिकेतील बबड्या आणि शुभ्राच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले होते. बबड्याची भूमिका अभिनेता आशुतोष पत्कीने साकारली होती तर शुभ्रा हे पात्र अभिनेत्री तेजश्री प्रधानने साकारले होते. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आशुतोष आणि तेजश्री हे चर्चेत असतात. ते सतत एकमेकांच्या फोटोवर कमेंट करताना दिसतात. त्यामुळे ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत अशा चर्चा रंगल्या होत्या. आता तेजश्रीने आशुतोषच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.
तेजश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आशुतोषसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने आशुतोषला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्यासोबत सहभागी होणाऱ्या माझ्या पार्टनरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा’ या आशयाचे कॅप्शन तेजश्रीने फोटो शेअर करत दिले आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत आशुतोषवर शुभेच्छांचा वर्षावर केला होता.
आणखी वाचा : घटस्फोटानंतर ५० कोटी रुपये उकळले म्हणणाऱ्याला समांथाचे सडेतोड उत्तर, म्हणाली…
आशुतोषने कमेंट करत ‘तुझे मनापासून आभार’ असे म्हटले आहे. सध्या तेजश्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. अनेकांनी कमेंट करत आशुतोषला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत ‘करुन टाकाना लग्न आता… तुम्हाला काय समस्या आहेत’ असे म्हटले आहे.
‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी शुभ्रा आणि बबड्याची जोडी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. तेजश्री आणि आशुतोष नेहमी एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. त्याच्या अफेअरच्या जोरदार चर्चा सुरु असतात.