बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्या नात्याची सोशल मीडियावर सतत्यानं चर्चा आहे. एकीकडे तेजस्वी तिच्या आगामी मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तर दुसरीकडे करण कुंद्रासोबत तेजस्वीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. यासोबतच तेजस्वी सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. नुकतंच तिनं चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर लाइव्ह सेशन ठेवलं होतं. ज्याबाबत ती तिनं करणसोबतच्या लग्नाच्या प्लानवर भाष्य केलं.
सध्या टीव्ही इंडस्ट्रीतील बऱ्याच अभिनेत्रींची लग्न होताना दिसत आहेत. अशात जेव्हा तेजस्वीला तिच्या चाहत्यांनी, ‘तू आणि करण कधी लग्न करणार?’ असा प्रश्न लाइव्ह सेशनमध्ये विचारला. तेव्हा तिनं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना करणबाबत तक्रार केली. तसेच करणनं अद्याप आपल्याला लग्नासाठी प्रपोज केलेलं नाही असंही तिनं यावेळी सांगितलं.
तेजस्वी म्हणाली, ‘तो सध्या त्याचा सर्वात चांगला मित्र उमर रियाजसोबत व्यग्र आहे. सध्या बरीच लग्न होताना दिसत आहेत. मी हे पाहून हैराण आहे. श्रद्धा आर्यानं अलिकडेच लग्न केलं. काही दिवसांपूर्वीच मौनी देखील लग्नाच्या बेडीत अडकली. आता करिश्मा तन्नाचंही लग्न आहे. मी या सर्वांसाठी खूप खूश आहे. पण माझ्या लग्नाच्या प्लान बद्दल सांगायचं तर मला करण कुंद्रानं लग्नासाठी अद्याप प्रपोज केलेलं नाही. मला वाटतं आता उमरला भेटून आल्यानंतरच तो मला लग्नासाठी विचारेल. मला वाटतं मी त्याच्याशीच लग्न करेन.’
तेजस्वीला जेव्हा या लाइव्हमध्ये, ‘ करण कुंद्रा कुठे आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना तेजस्वी म्हणाली, ‘तो आज त्या व्यक्तीसोबत आहे ज्या व्यक्तीबाबत मला शंका होती की तो माझ्यापेक्षा जास्त प्रेम त्याच्यावर करतो. तो आहे उमर रियाज. त्यांनी मला याबाबत बिग बॉसच्या घरातच सांगितलं होतं की ते दोघंही एकमेकांसोबत एन्जॉय करणार आहेत. पण करण माझ्यासोबत असं वागेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. तो माझ्याशी कॉलवरही बोलत नाही. तो फोनवर फक्त एवढंच सांगतो की, मी उमरसोबत आहे. ओके बाय.’