मुंबई : एकीकडे ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो…’ हा अवघ्या महाराष्ट्राच्या ओळखीचा कणखर आवाज… तर दुसऱ्या क्षणी दंगल, मारामारी, जाळपोळ, धुडगूस या सगळ्याच्या मध्ये ‘ठाकरे साहेब’ असा हलकासा कानी पडणारा आवाज… या ‘येक नंबर’च्या आगामी चित्रपटाच्या टीझरने सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एन्टरटेन्मेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित ‘येक नंबर’ या चित्रपटाचा टीझर आणि ‘जाहीर झाले जगाला’ हे पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून या चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येत्या १० ऑक्टोबरला अभिनेत्री तेजस्विनी पंडितची निर्मिती असलेल्या ‘येक नंबर’ या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहेत.
‘येक नंबर’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जीवनावर आधारित आहे का? अशी सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री तेजस्विनी पंडित निर्मात्याच्या भूमिकेत आहे.या चित्रपटाच्या टीझरमधून अभिनेता धैर्य घोलप आणि अभिनेत्री सायली पाटीलची झलक दिसत असून चित्रपटातील अन्य कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात आहेत.
हेही वाचा >>>फरहान अख्तर-अधुनाच्या घटस्फोटावर मुलींची प्रतिक्रिया काय होती? अभिनेता खुलासा करत म्हणाला, “त्यांनी भावनिक धक्का…”
दिग्दर्शक राजेश मापुस्कर म्हणतात, ‘ही कथा जेव्हा मी ऐकली तेव्हा मला वाटले, मला या चित्रपटाच्या निमित्ताने नवीन पद्धतीने गोष्ट मांडायची संधी मिळाली आहे. प्रेक्षकांना ही माझी मांडणी कशी वाटेल, या बद्दल खूप उत्सुकता आहे.’ निर्माती तेजस्विनी पंडित म्हणाली, ‘चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलापासून प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. मराठी प्रेक्षक कथानकाला विशेष प्राधान्य देतात’.