Revanth Reddy on Allu Arjun Arrest: ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लु अर्जुनची अटक आणि त्यानंतर सुटका यामुळं शुक्रवारचा (१३ डिसेंबर) दिवस चांगलाच गाजला. तेलंगणा उच्च न्यायालयाने आता त्याला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाचे पडसाद आता राजकारणावरही उमटू लागले आहेत. या अटकेनंतर भाजपानं तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना जबाबदार धरलं. त्यानंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पोलीस त्यांचे काम करत असल्याचे म्हटले होते. मात्र काल सायंकाळी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी या विषयावर सविस्तर भाष्य केलं आहे. तसेच या अटकेचं समर्थन करत असताना मृत महिलेबाबत कुणीही बोलत नसल्याचं म्हटलं आहे.

इंडिया डुटेला दिलेल्या मुलाखतीमध्ये रेवंत रेड्डी म्हणाले, अल्लू अर्जुन कोणतीही पूर्वकल्पना न देता ४ डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये आला होता. त्यामुळं एकच गोंधळ उडून चेंगराचेंगरी झाली. त्यात ३९ वर्षीय महिला मृत्यूमुखी पडली असून तिचा लहान मुलगा कोमामध्ये आहे. अल्लू अर्जुन थिएटरमध्ये येऊन सिनेमा पाहून गेला असता तरी काही हरकत नव्हती. पण त्याने ग्रँड एंट्री घेतली. गाडीच्या सनरुफमधून बाहेर येत तो लोकांना हातवारे करत होता, त्याच्या चाहत्यांना अभिवादन करत होता. यामुळे लोक नियंत्रणाच्या बाहेर गेले.

हे वाचा >> अल्लू अर्जुनला तुरुंगात घालवावी लागली रात्र, सुटकेनंतरचा पहिला व्हिडीओ आला समोर

अल्लू अर्जुन सीमेवर युद्ध करून आलाय का?

अल्लू अर्जुनच्या अटकेचं समर्थन करत असताना रेवंत रेड्डी पुढे म्हणाले, “सगळे लोक त्याच्या अटकेबद्दल बोलत आहेत. पण चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचं काय? तिचा मुलगा अजूनही कोमात आहे, तो बरा झाल्यानंतर त्याची आई कुठंय हे विचारेल, तेव्हा त्याला काय सांगायचं?अल्लू अर्जुनने चित्रपट बनवला आणि पैसे कमवले. त्याच्याशी सामान्य माणसाचे काहीच देणंघेणं नाही. अल्लू अर्जुननं सीमेवर जाऊन देशासाठी युद्ध केलं आहे का? मग त्याचा एवढा गवगवा कशासाठी?”

अल्लू अर्जुनची पत्नी माझी नातेवाईक

रेवंत रेड्डी पुढं म्हणाले, अल्लू अर्जुनची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डी ही माझी नातेवाईक आहे. पण तरीही त्याला अटक करताना आपण नातं मध्ये आणलं नाही. तुमचा आवडता तेलुगु कलाकार कोणता, तुम्ही कुणाचे चाहते आहात? असाही प्रश्न रेवंत रेड्डी यांना विचारला होता. त्यावर ते म्हणाले, मी स्वतःच स्टार आहे, मी कुणाचाही चाहता नाही.

अटकेचा घटनाक्रम

अल्लू अर्जुनला शुक्रवारी अटकेनंतर वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला नामपल्ली कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याला चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आलं. याचदरम्यान, अभिनेत्याने तेलंगणा हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाल्यानंतर त्याला कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला. ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर कोर्टाने त्याला जामीन दिला होता. त्यानंतर तो आज घरी जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यानुसार, त्याला एक रात्र तुरुंगात घालवावी लागली.

Story img Loader