कलाकारांच्या वाट्याला येणारी लोकप्रियता ही त्या कलाकाराचं भवितव्य ठरवते, असं अनेकांचच म्हणणं आहे. टेलिव्हिजन विश्वातीच एका अभिनेत्रीला याचा प्रत्ययही आला आहे असंच म्हणावं लागेल. ती अभिनेत्री म्हणजे अनू मेनन. काही आठवतंय का? ‘लोला कुट्टी’ हे पात्र साकारत दाक्षिणात्य (मल्याळी) महिलेच्या रुपात लोला प्रेक्षकांच्या भेटीला यायची. हे पात्र साकारत तिने आपली अशी स्वत:ची ओळख प्रस्थापित केली होती. पण, त्यानंतर साधारण २०११ पासून तिने टेलिव्हिजन विश्वातून काढता पाय घेतला. तेव्हापासून ते आजपर्यंत ‘लोला’ म्हणजेच अनूची चाहत्यांना आठवण येत राहिलीच, तिची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. एक कलाकार म्हणून अनूला प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम पाहता आता तिने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतण्याचा निर्णय घेतला आहे.
‘डीएनए’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ‘क्वीन्स व्हर्सेस किंग्स’ या शोमधून अनू पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खुद्द अनुनेच याविषयीची माहिती दिली. ‘२०११ मध्ये वाहिनी सोडल्यानंतर मी गरोदर होते. त्याआधीपासूनच टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये जास्तच काम केल्यामुळे मला काही काळ गरज विश्रांतीची होती. पण, यादरम्यान रंगमंचावरचं माझं प्रेम काही केल्या कमी झालं नाही. मी वेब शोसुद्धा केले. पण, आता माझा मुलगा पाच वर्षांचा झाला आहे. त्यामुळे मी स्वत:च्या करिअरकडे पुन्हा एकदा लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे’, असं अनू म्हणाली. आगामी ‘क्वीन्स अँड किंग्स’ या शोमध्ये अनू एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असून, त्यामध्ये स्टँड अप कॉमेडी, काही धमाल गेम्स आणि मुला- मुलींमध्ये होणारी ‘तू तू मै मै’ पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
‘लोला कुट्टी’ ही प्रसिद्ध व्यक्तीरेखा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याच्या विचारात तू आहेस का, असा प्रश्न विचारला असता अनू म्हणाली, ‘हो तसा विचारही आम्ही केला होता. पण, काही कराणास्तव ती गोष्ट पुढे जाऊ शकली नाही. पण, त्याविषयी मी आशावादी आहे.’ छोट्या पडद्यावर आता बऱ्याच गोष्टी बदलल्या असल्याचंही तिने स्पष्ट केलं. त्या वेळी विविध सेलिब्रिटींच्या मुलाखती घेणारी लोला प्रेक्षकांच्या परिचयाची होती. अर्थात तेव्हा तशा प्रकारचे फारसे कार्यक्रमही नव्हते. पण, आता तसं नसून गप्पा, चर्चासत्रांच्या कार्यक्रमांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे जर ‘लोला कुट्टी’ला प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा नव्याने सादर करायचं असेल तर तिच्यामध्ये काही बदल करण्याची गरज असल्याचंही तिने स्पष्ट केलं.