गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील फिल्म सिटीमध्ये शूट करत असलेल्या मालिकेच्या सेटवर धक्कादायक घटना घडताना दिसत आहेत. कधी कुठल्या सेटवर आग लागतेय तर कधी सेटवर बिबट्याचा वावर पाहायला मिळत आहे. अशातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘इमली’ मालिकेच्या सेटवरील लाइटमनचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
मुंबईतील फिल्म सिटीमध्ये या मालिकेच्या शुटिंगदरम्यान विजेचा झटका लागून महेंद्र यादव नावाच्या लाइटमनचा मृत्यू झाला आहे. महेंद्र यादव हा अवघ्या २३ वर्षांचा होता. मूळचा तो गोरखपूरचा होता. आता पोस्टमार्टम झाल्यानंतर त्याच पार्थिव गोरखपूरला पाठवण्यात येणार आहे. माहितीनुसार, महेंद्र यादव याला काही दिवसांपूर्वी देखील विजेचा झटका लागला होता. पण त्यानंतर काल, १९ सप्टेंबरला त्याला पुन्हा विजेचा झटका लागला आणि त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा – Video: श्रद्धा कपूरने रश्मिका मंदानाला केलं इग्नॉर?; नेटकरी म्हणाले, “बॉलीवूडमधील लोकांना जास्त अहंकार…”
दरम्यान, महेंद्र हा ‘धडक कामगार युनियन’चा सदस्य होता. या युनियनचे अध्यक्ष अभिजीत राणे म्हणाले की, “आम्हाला या घटनेबाबत कळताच आम्ही तातडीने फिल्म सिटी गाठली. मालिकेच्या निर्मात्यांना या घटनेबाबत माहिती दिली, पण कोणीच आलं नाही. आता पोस्टमार्टम झाल्यानंतर त्याच पार्थिव गावी पाठवण्यासाठी तयारी सुरू आहे.”
हेही वाचा – ‘पिंकीचा विजय असो’ फेम अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा; म्हणाली, “आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला…”
पुढे अभिजीत राणे म्हणाले की, “मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करतो की, मालिका निर्माते गुल खान, प्रॉडक्शन हाऊस फॉर लाईन फिल्म्स आणि स्टार प्लस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये देण्यात यावे.” शिवाय त्यांनी फिल्मसिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि कामगार आयुक्त यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.