टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असतात. काही मालिकांचे कथानक इतके सुंदर असते की, अशा मालिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. अशा मालिकांसाठी, त्यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांसाठी चाहत्यांच्या मनात वेगळे स्थान असते. आता झी मराठी वाहिनीला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने ‘झी गौरव अवॉर्ड २०२४’मध्ये जुन्या मालिकेच्या कलाकारांनादेखील आमंत्रित केल्याचे दिसत आहे.
झी मराठी सोशल मीडिया अकाउंटवर ‘झी गौरव अवॉर्ड २०२४’मधील काही प्रोमो शेअर करत आहे. अशाच एका प्रोमोमध्ये ‘आभाळमाया’ या लोकप्रिय मालिकेतील कलाकारांना मंचावर आमंत्रित केले गेल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेतील सर्व कलाकार या मंचावर आल्यानंतर ‘आभाळमाया’चे शीर्षकगीत लावण्यात आले. यावेळी काही कलाकारांचे डोळे पाणावलेले दिसले, तर उपस्थित इतर कलाकारांनी उभे राहून टाळ्या वाजवत त्यांना दाद दिली, अभिवादन केले. आता ‘आभाळमाया’ ही त्या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांसाठीच नाही तर प्रेक्षकांनासुद्धा तितकीच जवळची आहे, हे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी या प्रोमोच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काय म्हणाले चाहते?
‘आभाळमाया’ मालिकेतील कलाकारांना पुन्हा एकदा एकत्र बघितल्यानंतर आणि मालिकेचे शीर्षकगीत ऐकल्यानंतर प्रेक्षकांनीदेखील आपले प्रेम व्यक्त केले आहे. “९०चा काळ वेगळा होता. आम्ही नशिबवान आहोत, त्या काळात आम्ही जन्माला आलो आणि आमच्या वाटेला अशा छान प्रकारच्या मालिका आल्या. ‘अल्फा चॅनेलचे आभार’, हे गाणं ऐकलं की लहानपण जगल्याचा अनुभव येतो. गाणं ऐकलं की एक आपलेपणाची भावना निर्माण होते. अशा मालिका आता कुठेही नाहीच, असं संगीतही नाही आणि तशी माणसंही नाहीत. आम्ही नशिबवान आहोत, आमचं बालपण अशा सीरियल पाहण्यात गेलं”, असे म्हणत एका चाहत्याने मालिकेचे कौतुक केले आहे. एका चाहत्याने म्हटलं, “आभाळमाया मालिका, खूप खूप आठवणी आहेच; त्या मालिका, ती नाती, तो आपलेपणा, आयुष्यभर स्मरणात राहणारी मालिका आणि शीर्षक गीत अजूनही ऐकताना डोळ्यात पाणी येतंच.”
“सगळेच लाजवाब, अगदी घरातले वाटायचे”, “खरंच डोळ्यात पाणी आलं आणि पुन्हा बालपण आठवलं”, “जुन्या आणि खऱ्या मोत्याची माळ, अविस्मरणीय”, “वादळ वाट, आभाळ माया, अशा मालिका खूप छान होत्या”, “कान तृप्त झाले आभाळ माया शीर्षक गीत ऐकून”, अशा प्रकारच्या कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, ‘आभाळमाया’ ही मालिका १९९९ ला प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सुकन्या कुलकर्णी मोने, संजय मोने, हर्षदा खानविलकर, मुग्धा गोडबोले, मुक्ता बर्वे असे अनेक कलाकार या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत होते.