आदेश व सुचित्रा बांदेकर यांना कलाविश्वातील आदर्श जोडी म्हणून ओळखलं जातं. त्यांचा लेक अभिनेता-निर्माता सोहम बांदेकर हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वीच सोहमने आपल्या आई-बाबांच्या पावलावर पाऊल टाकत कलाविश्वात पदार्पण केलं. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून तो छोट्या पडद्यावर झळकला. त्याबरोबरच सोहमने ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यावेळी सोहमच्या चाहत्यांनी त्याला काही भन्नाट प्रश्न विचारले. या सगळ्या प्रश्नांवर त्याने भन्नाट उत्तर दिली आहेत.
मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. यंदाचं वर्ष सुरू झाल्यापासून शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरे, तितीक्षा तावडे-सिद्धार्थ बोडके, प्रथमेश परब-क्षितिजा, पूजा सावंत-सिद्धेश चव्हाण, योगिता-सौरभ अशा अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधल्याचं आपण पाहिलं. अशातच काही दिवसांपूर्वी ‘घरोघरी मातीच्या चुली’ या नवीन मालिकेच्या लॉन्च सोहळ्यावेळी सोहम बांदेकर व त्याच्या आई-वडिलांना सुद्धा त्याच्या लग्नाबद्दल, तुम्हाला सूनबाई कशी हवीये असे प्रश्न विचारण्यात आले होते. आता पुन्हा एकदा ‘आस्क मी सेशन’मध्ये सोहमला त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला आहे.
हेही वाचा : “लग्नाआधी ३ वर्षे एकत्र राहिलो”, रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल म्हणाले, “आई बाबांनी…”
सोहमला एका नेटकऱ्याने “पुण्याचा जावई व्हायला आवडेल का?” असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्याने मिश्किलपणे उत्तर देत “एवढं पुण्य नाही केलंय मी” असं म्हटलं आहे. याआधी सुद्धा एका नेटकऱ्याने “तुला लग्नासाठी कशी मुलगी हवी” असा प्रश्न सोहमला विचारला होता. यावर त्याने “कशीही चालेल फक्त आईला आवडली पाहिजे बस…” असं उत्तर दिलं होतं.
हेही वाचा : Video : ‘गुलाबी साडी’ गाण्याची नेहा कक्करला पडली भुरळ! संजू राठोडचं केलं कौतुक, म्हणाली…
सोहमच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या महाराष्ट्रात आघाडीवर असलेली ‘ठरलं तर मग’ मालिकेची निर्मिती सोहम प्रोडक्शनद्वारे करण्यात येत आहे. याशिवाय अभिनेता म्हणून ‘नवे लक्ष्य’ ही सोहमची पहिलीच मालिका होती. या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. ही मालिका ७ मार्च २०२१ रोजी सुरु झाली होती. सध्या सोहम प्रोडक्शनच्या एकूण तीन मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. याशिवाय गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात सोहम पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला होता.