महाराष्ट्राचे लाडके ‘होम मिनिस्टर’ भावोजी म्हणून आदेश बांदेकर यांना ओळखलं जातं. २०१७ पासून ते सिद्धिविनायक गणपती मंदिरात न्यास व्यवस्थापनेच्या अध्यक्षपदी होते. २३ जून २०२३ पर्यंत त्यांची या पदावर नियुक्ती होती. त्यांच्या अध्यक्षपदाची मुदत संपल्यामुळे त्यांच्या जागी शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर अभिनेत्यावर काही आरोप-प्रत्यारोप देखील करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणावर आदेश बांदेकर यांनी नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे.
आदेश बांदेकर म्हणाले, “आपण अध्यात्म खूप मानतो… मी मागे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा एकच गोष्ट सांगितली होती ती म्हणजे, आयुष्यात अनेक गोष्टी होत असतात पण, शेवटी सिद्धिविनायकाला मला उत्तर द्यायचं आहे. मी साडेसहा वर्षे मंदिरात अध्यक्ष होतो आणि माझ्या नावाचं एकही व्हाउचर मंदिरात नाहीये. एक लाडू जरी घेतला तरी मी त्याचे पैसे दिलेले आहेत. याबद्दल सगळा रेकॉर्ड आहे.”
बांदेकर पुढे म्हणाले, “सिद्धिविनायक मंदिराच्या न्यास समितीमध्ये काम करताना मला राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला होता. ज्या दिवशी मला हा दर्जा मिळाला, त्या दिवसानंतर बरोबर एक महिन्यांनी मी विधीन्याय विभागाला पत्र दिलेलं आहे की, मी कुठलाही भत्ता घेणार नाही आणि मी नाही घेतला. बऱ्याच वेळेला अशा मोठ्या देवस्थानांसाठी काम करायला मिळणं ही आपल्या आई-वडिलांची पुण्याई असते.”
हेही वाचा : पडद्यावर कोणाची भूमिका करायला आवडेल? शरद पवार यांचं नाव घेत प्रसाद ओक म्हणाला, “ते महाराष्ट्रातील…”
“मंदिरात जे भाविक दानपेटीत पैसे देतात…त्यांच्या एक-एक रुपयाचं मोल खूप मोठं असतं. त्यामुळे या काळात मला सिद्धिविनायकाची सेवा करायला मिळाली ही खूप मोठी गोष्ट आहे. मला आनंद कधी व्हायचा ज्यावेळी मी वैद्यकीय मदतीचा चेक सही करून द्यायचो. गरजू माऊली येऊन तो चेक जेव्हा डोक्याला लावायची. तेव्हा मन भरून यायचं. ज्याठिकाणी एक-एक रुपयाचं एवढं मोठं मोल आहे तिथे चुकीचा विचार मनात येणं केवळ अशक्य आहे. त्या देवाला मला उत्तर द्यायचंय म्हणून मी उत्तमप्रकारे काम करून त्याची सेवा केली. निष्ठेने काम केलं म्हणून आजही आनंदाने प्रवास सुरूये अजून काय पाहिजे.” असं आदेश बांदेकर यांनी सांगितलं.