“दार उघड बये, दार उघड…” महाराष्ट्रातील घरोघरी संध्याकाळच्या वेळी हे शीर्षक गीत ऐकू आलं की, समजून जायचं आदेश बांदेकरांचा होम मिनिस्टर कार्यक्रम आता चालू झाला आहे. गेली २० वर्षे आदेश बांदेकर या कार्यक्रमात सूत्रसंचलनाची जबाबदारी निभावत आहेत. आता त्यांना सर्वत्र महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणून ओळखलं जातं. नाटक असो किंवा मालिका त्यांनी प्रत्येक माध्यमांत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदेश बांदेकरांच्या ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण आहे ती म्हणजे मानाची पैठणी साडी. प्रत्येक गृहिणीच्या मनात आपल्याकडे हे मानाचं वस्त्र असावं अशी भावना असते. बांदेकरांनी नुकत्याच दिलेल्या लोकमत फिल्मीच्या मुलाखतीत ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे अनेक किस्से सांगितले.

हेही वाचा : ऑस्करच्या अधिकृत पेजवर झळकली दीपिका पदुकोण! ‘बाजीराव मस्तानी’शी आहे खास कनेक्शन, पती रणवीर म्हणाला…

“गेली २० वर्षे महाराष्ट्राच्या घराघरांत पैठणी घेऊन जाणाऱ्या आदेश बांदेकरांनी सुचित्रा यांना किती पैठण्या दिल्या?” यावर अभिनेते म्हणाले, “सध्या मी तिला साड्या घेतच नाही कारण, ती थेट मला बिलं आणून दाखवते. कारण, पैठणी साडी ही महाराष्ट्राचं महावस्त्र म्हणून ओळखली जाते. अशी ही पैठणी जेव्हा एखाद्या माऊलीच्या अंगावर जाते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं तेज हे खूप मोठं असतं. अगदी तसंच तेज माझ्याही घरात असावं असं मला वाटणं फारच स्वाभाविक आहे. त्यामुळे मी स्वत: जाऊन एक – दोनवेळा तिला पैठणी साडी विकत घेऊन दिली होती. पण, त्यानंतर आता ती स्वत: साड्या खरेदी करते आणि मला दाखवते.”

हेही वाचा : “नाटकाला अर्ध्या तिकिटात प्रवेश मिळेल का?”, विचारणाऱ्या नेटकऱ्याला प्रशांत दामलेंनी दिलं मजेशीर उत्तर, म्हणाले…

“लग्न केलं तेव्हा मी सुचित्राला काहीच देऊ शकत नव्हतो. पण, त्यावेळी मी एक इच्छा व्यक्त केली होती. ती म्हणजे, प्रामाणिकपणाच्या जोरावर मी माझी अशी परिस्थिती तयार करेन की, कधीच तुला लेबल पाहून वस्तू विकत घ्यावी लागणार नाही. त्यासाठी आज मला २५ वर्षे मेहनत घ्यावी लागली आणि आता आमच्या संसाराला एकूण ३३ वर्षे पूर्ण झाली आहेत. आपण एकदा स्वच्छ कामाचा मार्ग निवडला की, आपल्याला पुन्हा मागे वळून पाहावं लागत नाही.” असं आदेश बांदेकरांनी सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aadesh bandekar reveals how many paithani saree he gifted to wife suchitra in recent interview sva 00