आदेश बांदेकर मराठी मनोरंजन आघाडीचे अभिनेते म्हणून ओळखले जातात. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे ते घराघरांत लोकप्रिय झाले. अलीकडेच या कार्यक्रमाने तब्बल १९ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राच्या लाडक्या भावोजींनी गेल्या काही दिवसांत अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. नुकत्याच ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सात वर्षांपूर्वी उद्भवलेल्या जीवघेण्या प्रसंगाविषयी सांगितलं. डॉक्टरांचे वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती सुधारली नेमकं काय घडलं होतं? जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : वडिलांच्या भीतीमुळे बँकेत नोकरी ते बॉलीवूडमध्ये पदार्पण, असा आहे सोहा अली खानचा प्रवास

आदेश बांदेकर आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेहमीच पालेभाज्या किंवा विविध भाज्यांच्या रसांचं सेवन करायचे. परंतु, एके दिवशी आरोग्यदायी मानला जाणारा दुधीचा रस त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला. १८ डिसेंबर २०१५ ला त्यांच्याबरोबर नेमकं काय घडलं हे सांगताना आदेश बांदेकर म्हणाले, “आयुष्यातील त्या एका प्रसंगामुळे मला पुन्हा एकदा आजीची आठवण झाली. सकाळी मी नेहमीप्रमाणे उठलो आणि त्या दिवशी मला कर्जतला शूटिंगसाठी जायचं होतं. सुचित्रा तिच्या कामानिमित्त आधीच बाहेर गेली होती. तेव्हाच मला उद्धव साहेबांचा फोन आला होता.”

हेही वाचा : “कुशल बद्रिकेचे पुढचे दोन दात खोटे…” प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक खुलासा करत म्हणाला, “रुमाल रक्ताने…”

आदेश बांदेकर पुढे म्हणाले, “सवयीप्रमाणे मी ज्यूस पिण्यास सुरूवात केली, सर्वांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जर दुधी हा कडू असेल, तर त्यात दहा नागांचं विष असतं. ज्यूस पिताना उद्धव साहेबांचा फोन सुरू होता म्हणून मी घरात थांबलो आणि वाचलो, नाहीतर मी त्याआधीच घाईघाईत कर्जतला निघालो असतो. त्या दुधीच्या रसामुळे मला २५ मिनिटांमध्ये अचानक मला उलट्या आणि जुलाब सुरू झाले. पुढच्या दीड ते दोन तासांमध्ये मला तीन ते साडेतीन लिटर रक्ताची उलटी झाली. रक्ताच्या उलट्यांमुळे हार्टरेट कमी झाला होता. मला दोघंजण जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले.”

हेही वाचा : प्राजक्ता माळीच्या कर्जतमधील आलिशान फार्महाऊसचं एका दिवसाचं भाडं माहितीये का? आकडा वाचून व्हाल थक्क

“रुग्णालयात पोहोचेपर्यंत माझी प्रकृती फार बिघडली होती. तेथील डॉक्टरांनी सुचित्राला फोन करायला सांगितलं आणि लगेच बोलावून घ्या, आता आमच्या हातात काही नाही असं सांगितलं. पुढे, माझे डोळे बंद झाले. काय जादू झाली मला आजपर्यंत माहिती नाही जवळपास संध्याकाळी सहा ते साडेसहा दरम्यान मी पुन्हा डोळे उघडल्यावर समोर सोहम, सुचित्रा आणि उद्धव साहेब असे तिघे उभे होते तो प्रसंग मी कधीही विसरणार नाही. माझ्या आयुष्यात एवढं घडून गेलंय हे मी त्या क्षणाला विसरलो होतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपली आजी कोणतीही भाजी कापली की, आधी ती चावून बघायची… हे करणं फार गरजेचं आहे. असे प्रसंग आयुष्यात बऱ्याचवेळा येतात आणि आपल्याला खूप काही शिकवून जातात.” असं आदेश बांदेकर यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aadesh bandekar shared crucial incident of his life when he had poisonous juice sva 00