आदेश व सुचित्रा बांदेकर यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. मालिकेच्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली होती. भेट झाल्यावर आधी मैत्री आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. कालातरांने आदेश-सुचित्रा यांनी १४ नोव्हेंबर १९९० रोजी पळून लग्न केलं. काही दिवसांपूर्वीच या जोडप्याच्या सुखी संसाराला तब्बल ३३ वर्षे पूर्ण झाली. या दोघांनाही सोहम नावाचा एक मुलगा आहे. आदेश बांदेकर नववर्षाच्या निमित्ताने नुकतेच आपल्या कुटुंबीयांबरोबर देवदर्शनाला गेले आहेत.
आदेश बांदेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यातील प्रत्येक अपडेट ते आपल्या चाहत्यांना देत असतात. नववर्षाची एक नवीन सुरुवात करण्यासाठी बांदेकर आपल्या कुटुंबीयांबरोबर देवदर्शनासाठी गेले आहे.
हेही वाचा : टीआरपीसाठी सायली-मुक्ताच्या मालिकांमध्ये चुरस; टॉप-२० मध्ये ‘झी मराठी’च्या ‘या’ तीन मालिकांचा समावेश
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटी असूनही संपूर्ण बांदेकर कुटुंबीय रेल्वे प्रवास करून देवदर्शनाला गेले होते. याचे काही फोटो आदेश बांदेकरांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये अभिनेते सहकुटुंबीय रेल्वे स्थानकावर ट्रेनची वाट पाहत असल्याचं पाहायला मिळत आहे.
आदेश बांदेकर या फोटोंना कॅप्शन देत लिहितात, “प्रवास सहकुटुंब ट्रेनचा.. गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर दर्शनाचा .. योग आनंदयात्रेचा…” त्यांच्या कॅप्शनवरून अभिनेते कोणकोणत्या देवस्थानाला भेट देणार हे स्पष्ट झालेलं आहे.
दरम्यान, आदेश यांनी शेअर केलेल्या या रेल्वे प्रवासाच्या फोटोंचं व बांदेकर कुटुंबीयांच्या साधेपणाचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. अनेक नेटकऱ्यांनी या संपूर्ण कुटुंबाला येत्या वर्षासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.