अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम नेहमी चर्चेत असतो. आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सोहमने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आई-वडिलांप्रमाणेच सोहमचा चाहतावर्गही मोठा आहे.
सोहम सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान, सोहमने नुकतेच इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन घेतले. या सेशनमध्ये सोहमने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी एका चाहत्याने “तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे”, असा प्रश्न विचारला. त्यावर सोहमने उत्तर देत, “काय योग्य आणि काय चूक हे जाणून घेण्यासाठी पुरेसे पात्र असं माझं शिक्षण आहे आणि मला आशा आहे की ते पुरेसे आहे”, असे म्हटले आहे. सोहमच्या या उत्तराने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
याअगोदरही सोहमने आस्क मी एनिथिंग सेशनमधून आपल्या करिअरबाबत वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत. काही दिवसांपूर्वीच सोहमने लग्नासाठी त्याला कशी मुलगी हवी आहे याबाबतचा खुलासा केला होता. चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देत सोहम म्हणालेला, “कशीही चालेल; आईला आवडली पाहिजे बस”. सोहमच्या या उत्तरानंतर तो लवकरच लग्न करणार आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
सोहमच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ मालिकेतून सोहम घराघरांमध्ये पोहोचला. या मालिकेत सोहमने या मालिकेत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर सोहम ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. अभिनयाबरोबरच सोहमने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे. ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेची निर्मिती सोहमने केली आहे.