राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. आदित्य ठाकरे हे सक्रीय राजकारणात कायमच सहभागी असतात. ते कायम विविध राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना दिसतात. नुकतंच एका कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी त्यांचा टेलिव्हीजनवरील आवडता कार्यक्रम कोणता याबद्दल भाष्य केले.
आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मटा कॅफे’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर दिलखुलास पद्धतीने उत्तर दिली. यात त्यांनी राज्यातील राजकीय विषयांबरोबर कौटुंबिक विषयांवरही मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. या दरम्यान आदित्य ठाकरेंना ते त्यांच्या घरी टीव्हीवर कोणता कार्यक्रम पाहतात? किंवा त्यांनी हल्ली कोणती वेबसीरिज पाहिली आहे? असा प्रश्न विचारण्यात आला.
आणखी वाचा : “खरं सांगायचं तर…” छगन भुजबळांनी सांगितले गळ्यात नेहमी मफलर परिधान करण्याचे कारण
यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “मी काही दिवसांपूर्वी क्राऊन ही नेटफ्लिक्सची सीरिज पाहिली. पण आता हल्लीच काहीही पाहिलेले नाही. पण मी माझ्या वडिलांबरोबर कधीतरी अर्धा तास टीव्हीवरील एक कार्यक्रम नक्कीच पाहतो. तो कार्यक्रम मलाही फार आवडतो.”
“मला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम फार आवडतो. तो मी फार आवडीने बघतो. सोनी मराठीवरील या कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला हसवण्याचे काम केले आहे. मी माझे वडील उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कधीतरी निदान अर्धा तास तरी हा कार्यक्रम पाहतो. याबरोबर मी चला हवा येऊ द्या हा कार्यक्रमही पाहत असतो.” असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले.
आणखी वाचा : “माझा नवरा गेल्या ३० वर्षांपासून…”, अभिनेता अंशुमन विचारेची पत्नी स्पष्टच बोलली
दरम्यान ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम फार लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमातील अनेक विनोदवीर हे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असतात. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत समीर चौगुले, प्रिथ्वीक प्रताप, रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात हे कलाकार नुकतंच नागपूरकरांच्या भेटीस आले आहेत. यावेळी नागपूर विमानतळावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार यांची भेट झाली. याचे काही फोटो नुकतंच समोर आले आहेत.