Aai Aani Baba Retire Hot Aahet : छोट्या पडद्यावर आता नव्या मालिकांची नांदी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर राहण्यासाठी वाहिन्यांकडून नेहमीच नवनवीन प्रयोग केले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीत ‘स्टार प्रवाह’ वाहिनी पुढे आहे. यामुळे आता येत्या काळात प्रेक्षकांचं आणखी मनोरंजन करण्यासाठी ‘स्टार प्रवाह वाहिनी’वर अनेक नव्या मालिका सुरू होणार आहेत. वाहिनीकडून नुकतीच ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या नव्या मालिकेची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीने सप्टेंबर महिन्यात ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांसमोर सादर केली. या पहिल्या प्रोमोतून ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिका साकारत असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे या मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेच्या शुभारंभाचा दिवस आणि प्रदर्शनाची वेळ जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा : भेटला विठ्ठल माझा…; सूरज पोहोचला केदार शिंदेंच्या घरी! ‘गुलीगत किंग’ला दिली खास भेटवस्तू, Video एकदा पाहाच
‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत प्रेक्षकांना आई-बाबा आपल्या मुलांसाठी किती कष्ट करतात आणि त्यानंतर एक दिवस येतो रिटायरमेंटचा…आता रिटायरमेंटनंतर दोघांची इच्छा असते गावी जाऊन राहण्याची, ही इच्छा पूर्ण होईल का? मुलांच्या व कुटुंबाच्या जबाबदारीतून मुक्त होऊन हे जोडपं सुखी रिटायरमेंट आयुष्य जगू शकेल का? असं कथानक पाहायला मिळेल.
निवेदिता सराफ यांच्या जोडीला या मालिकेत अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिका साकारणार आहेत. प्रोमोमध्ये त्यांचा रिटायरमेंटचा दिवस असतो. “रिटायर झाल्यावर आपण दोघे मिळून गावी जाऊया” असं ते आपल्या पत्नीला सांगत असतात. परंतु, निवेदिता मुलांची व कुटुंबाची काळजी कशी घेणार याचा विचार करत असतात. आता हे जोडपं रिटायर झाल्यावर गावी जाणार की नाही? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
मालिकेची वेळ व तारीख जाहीर
निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मालिका २ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. आता या दोन मुख्य कलाकारांबरोबर मालिकेत इतर कलाकार कोणते झळकणार हे लवकरच उघड करण्यात येणार आहे.