‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेने फार कमी काळातच प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे. कुटुंब आणि त्यातील नाती, तसेच कुटुंबप्रमुख जेव्हा सेवानिवृत्त होतो, तेव्हा काय होतं? हे सर्व या मालिकेत दाखवलं जात आहे. सध्या या मालिकेमध्ये सीमा संकटात पडल्याचं दिसत आहे. फ्लॅटरूपी मोठ्या घराचं स्वप्न पाहता पाहता, ती आता राजेंद्र नारडा बिल्डरच्या जाळ्यात फसली आहे. मात्र, तिला या संकटातून बाहेर काढण्यासाठी शुभा तिच्या मदतीला धावून जाणार आहे.

‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे. त्यामध्ये शुभा नारडा बिल्डरला चांगलंच सुनावताना दिसत आहे. प्रोमोमध्ये दिसत आहे की, सीमा नारडा बिल्डरच्या ऑफिसमध्ये उभी आहे. नारडा बिल्डरला घराचे खोटे कागदपत्र मिळाल्याने तो तिच्यावर ओरडत आहे. “तुम्ही घराचे खोटे कागदपत्र दिले आणि त्यामुळे आता मी पोलिसांत जाणार”, असं तो म्हणत आहे. त्यामुळे सीमा गोंधळून जाते आणि तिला काय करावे अन् काय नाही ते समजत नाही.

तितक्यात तिथे शुभा येते. ती आल्यावर म्हणते, “मीसुद्धा तुमच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करणार आहे.” त्यावर नारडा तिला म्हणतो, “यात माझा काय संबंध आहे?” त्यावर शुभा म्हणते, “घराच्या मालकाशी काहीही संपर्क न साधता, तुम्ही सीमाला मोहात पाडलंत, फसवणूक करण्यासाठी तिला प्रवृत्त केलंत. हासुद्धा एक गुन्हा आहे नारडा. त्यामुळे आपण एकत्रच पोलिसांत जाऊ चला.” ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेच्या प्रोमोतील हा भाग १२ फेब्रुवारीला पाहता येणार आहे.

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका संपल्यानंतर त्या जागी ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही मालिका सुरू झाली आहे. कमी काळात ही मालिका खूप लोकप्रिय झाल्याचे दिसत आहे. मालिकेमध्ये निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांनी अनुक्रमे शुभा आणि यशवंत किल्लेदार अशी पात्रं साकारली आहेत.

मालिकेमध्ये सीमा हे पात्र अभिनेत्री प्रतीक्षा जाधव साकारत आहे. सीमा या मालिकेत सातत्यानं तिच्या कुटुंबीयांच्या विरोधात वागताना दिसते. काही दिवसांपूर्वीच मालिकेत मकरंद आणि स्वीटीचं लग्न झालं. त्यावेळीदेखील सीमानं स्वत: स्वीटीच्या कुटुंबीयांना भडकवून लग्नात बोलावून घेतलं होतं. त्यामुळे या लग्नात मोठा गोंधळ झाला होता.

सीमाला ते सध्या राहत असलेलं घर आवडत नाही. त्यामुळे ती काही दिवसांपासून सातत्यानं घर नारडा बिल्डरला देऊन, त्या जागी टॉवरमधील प्रशस्त फ्लॅट घेण्याचं स्वप्न पाहत आहे. तिचा हा डाव शुभाच्या आधीच लक्षातही आला आहे. काही दिवसांपूर्वी शुभा आणि यशवंत गावी गेल्याची संधी साधून, सीमानं घराची मोजणी करून घेतली होती. त्यानंतर तिनं गपचूप घराचे कागदपत्रसुद्धा नारडा बिल्डरला दिले. मात्र, ते कागदपत्रं खोटे निघाल्यानं नारडा बिल्डर चिडला आहे. तसेच तो पोलिसांत तक्रार करणार असल्याची धमकी सीमाला देत आहे. मात्र, शुभा आता पुन्हा एकदा आपल्या सुनेची चूक माफ करीत तिच्यासाठी लढताना दिसणार आहे.

Story img Loader