स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेने फार कमी वेळात मोठी लोकप्रियता मिळवली आहे. सध्या या मालिकेत लग्नसोहळा सुरू आहे. घरातील सर्वात धाकटा मुलगा मकरंद आणि स्वीटी या दोघांच्या लग्नाची लगबग सुरू आहे. त्यानिमित्त मालिकेत अनेक घडामोडी घडत आहेत. तसेच पाहुणे कलाकार म्हणूनदेखील अनेक कलाकार यात हजेरी लावताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालिकेमध्ये मकरंद आणि स्वीटी यांच्या मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. आता पुढे लग्नाची तयारी सुरू आहे. मकरंद आणि स्वीटीच्या लग्नात काहीसं विघ्न येणार आहे. विवाह सोहळ्याच्या विशेष भागाचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये भर लग्नमंडपात स्वीटीच्या माहेरची माणसे राडा करताना दिसत आहेत. स्टार प्रवाहच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

स्वीटी तिच्या कुटुंबीयांना न सांगता मकरंदच्या घरी आलेली असते, त्यामुळे प्रोमोमध्ये तिचे आई-वडील आणि भाऊ सर्व कुटुंब लग्न सुरू असताना तेथे दाखल होतात. तसेच हे लग्न होऊ शकत नाही असं तिचे बाबा मोठ्याने म्हणतात. त्यानंतर प्रोमो व्हिडीओमध्ये शिवा म्हणजे स्वीटीच्या भावाला तिला घेऊन येण्यासाठी सांगतात. शिवा स्वीटीचा हात पकडतो आणि तिला तेथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो.

मात्र, स्वीटीला जायचे नसते आणि मकरंदसुद्धा स्वीटीचा दुसरा हात पकडतो आणि शिवाला तिचा हात सोड असं सांगतो. त्यावर शिवा म्हणतो, ती बहीण आहे माझी. या सर्वांत स्वीटी फार रडू लागते, तसेच तिच्या भावाला माझा हात सोड असं म्हणत असते. शिवा आणि मकरंद दोघांमध्ये स्वीटीची मोठी ओढाताण होत असते, हे पाहून शुभा मकरंदच्या हातून तिचा हात सोडवते.

आईने सांगितल्यावर मकरंदसुद्धा स्वीटीचा हात सोडतो. त्यावेळी शिवा पटकन म्हणतो, पाहिलं, सोडला ना त्याने तुझा हात, हेच का तुमचं प्रेम. या सर्वांत स्वीटीने तिच्या माहेरच्या व्यक्तींसमोर सासूची आणि सासरच्या व्यक्तींची बाजू संभाळली आहे. तसेच त्या नात्याने सासू असल्या तरी माझी आई आहेत, असंही स्वीटी या प्रोमोमध्ये सांगताना दिसत आहे.

विवाह सोहळ्याचा हा विशेष भाग १ फेब्रुवारी रोजी दुपारी २:३० वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. प्रोमोमध्ये स्वीटीने सासरच्या व्यक्तींची बाजू सांभाळून घेतली आहे. मात्र, आता तिचे आई-वडील आणि भाऊ तेथे आल्याने हे लग्न होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.