‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेने फार कमी काळात प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे. मालिकेमध्ये सध्या शुभाच्या बहिणीची मुलगी शमिका त्यांच्या घरी राहण्यासाठी आली आहे. मात्र, सीमाला शमिकानं घरात राहणं अजिबात मान्य नाही. त्यासाठी ती सतत शमिकाला टोमणे मारत असते. त्यामुळे आता शमिकासुद्धा या त्रासाला कंटाळून घर सोडून बाहेर पडली आहे. त्यामुळे पुढे काय होणार याची काळजी प्रेक्षकांमध्ये आहे. अशात या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच समोर आला आहे.
या प्रोमोमध्ये शमिकाला घरात ठेवण्यासाठी शुभा तिच्या निर्णयावर अगदी ठाम असल्याचे दिसत आहे. प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, सीमा घरातील सर्वांना सांगते, “शमिकासारखं तुम्ही घरात प्रत्येकाला घेत राहिलात, तर एक दिवस आपणच रस्त्यावर येऊ. त्यावर तिला उत्तर देताना शुभानं शमिकाला आधार दिला आहे. तसेच ती या घरात हक्कानं का राहू शकते याचं कारणही तिला पटवून दिलं आहे.
सीमा आणि घरातील अन्य व्यक्तींना शुभा सांगते, “दाराच्या पाटीवर माझं नाव आहे, यांचं नाव आहे. पण, तरीही हे संपूर्ण कुटुंब आपल्या माणसांचं आहे, असं मी मानते. या घरातील प्रत्येक भिंतीमधील चार विटा माझ्या ताई आणि भाऊजींच्या आहेत. म्हणून शमिकानं या घरात हक्कानं राहिलं पाहिजे.”
मालिकेमध्ये शमिका काही दिवसांपासून शुभाच्या घरी राहत आहे. मात्र, ती या घरातून बाहेर जावी यासाठी सीमा तिला फक्त फुकट खायला पाहिजे आणि आराम पाहिजे, असं म्हणत असते. मागच्या भागात सीमा शमिकाला ती जेवत असताना खूप काही बोलते. त्यामुळे शमिका दुखावते आणि घरातून बाहेर पडते. ती बाहेर गेल्यानं कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती काळजीत आहे. तसेच बाहेर पडल्यावर काही मुलं तिचा पाठलाग करताना मालिकेच्या मागच्या भागात दिसले आहे.
‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेत एकीकडे शमिकामुळे घरात सर्व चिंतेत आहेत. तर दुसरीकडे सध्या नारडा बिल्डर शुभाचं घर हडपण्याच्या मागे आहे. सीमाच्या चुकीमुळे तिच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. त्यामुळे यातून सावरण्यासाठी ती आता प्रत्येक महिन्याला नारडा बिल्डरकडून घेतलेली रक्कम हप्त्याने त्यांना परत करत आहे. मात्र, त्यातही नारडा बिल्डर आता शुभाच्या गावातील घरावर नजर ठेवून आहे.