‘आई कुठे काय करते’ या छोट्या पडद्यावरील मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा कायम टॉप १० मध्ये असते. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी ‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाले. अलीकडेच या मालिकेतील सर्व कलाकारांनी स्ट्रार प्रवाहच्या गणेशोत्सव कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी मिलिंद गवळी यांनी गणपती बाप्पाची पूजा आणि मराठी सणांचं पावित्र्य राखणं किती गरजेचं आहे याविषयी आपलं मत मांडलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “कानटोपी, मोठा चष्मा अन्…”, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्री लवकरच दिसणार नव्या भूमिकेत, समोर आली पहिली झलक

मिलिंद गवळींनी तारांगणला दिलेल्या मुलाखतीत गणेशोत्सवातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. अभिनेते म्हणाले, “माझे वडील पोलीस अधिकारी होते त्यामुळे सणासुदीला ते घरी नसायचे. अशावेळी मला फार वाईट वाटायचं… जिथे गर्दी जास्त असेल किंवा पोलिसांची गरज असेल तिथे त्यांना वेळेत हजर राहावं लागायचं. गणपतीच्या दिवसांमध्ये त्यांना रात्रभर ड्युटी असायची अशावेळी त्यांच्या पायाला सूज यायची.”

हेही वाचा : तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ने मारली बाजी; ‘आई कुठे काय करते’ मालिकेला टाकलं मागे, पाहा TRP यादी

मिलिंद गवळी पुढे म्हणाले, “माझ्या वडिलांचे विशेषत: गणपती विसर्जनाच्यावेळी हाल व्हायचे. आपल्या इथे या गोष्टी आता कमी झाल्या असतील मला कल्पना नाही परंतु, आधी मुलं दारु वगैरे पिऊन दंगा-मस्ती करायचे. आजही मी नेहमी लोकांना सांगतो की, गणपती आणणं ही खूप पवित्र गोष्ट असते. टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाचा मूळ उद्देश अजूनही काही लोकांना माहितीच नाहीये. फक्त ८ ते १० दिवस सुट्टी असते आणि आपल्या इथे मंडप असतो म्हणून तिथे पत्ते खेळायचे या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. काही भागांत आता यामध्ये बराच बदल झाला आहे.”

हेही वाचा : “मुंबई महानगरपालिका…”, मराठी अभिनेता वाहतूक कोंडीमुळे त्रस्त, फोटो शेअर करत म्हणाला, “वेळ अन् स्थळ…”

“तुमच्या परिसरात अशा गोष्टी होत असतील, तर त्या बंद करण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या संस्कृतीचा आपण आदर केला पाहिजे. गणेशोत्सवाचं पावित्र्य जपणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ” असं मिलिंद गवळी यांनी सांगितलं. दरम्यान, मिलिंद गवळी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kute kay karte fame actor milind gawali reaction on ganpati festival sva 00