‘आई कुठे काय करते’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेचे नुकतेच तब्बल १ हजार भाग पूर्ण झाले. डिसेंबर २०१९ मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सुरुवातीपासूनच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. अजूनही ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर असून आज तीन वर्षांनंतरीही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
सध्या मालिकेत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत आहे. आगामी भागात संजना दहीहंडी फोडताना दाखवण्यात येणार आहे. अभिनेत्री रुपाली भोसलेने याचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने “गोविंदा रे गोपाळा, संजनाने दहीहंडी फोडली पण पुढे काय होणार?” असं कॅप्शन दिलं आहे. तसेच मालिकेचा नवा प्रोमोही समोर आला आहे.
देशमुख कुटुंबीय मोठ्या आनंदाने दहीहंडी उत्सव साजरा करत असताना संजना दहीहंडी फोडण्यासाठी वरच्या थरावर पोहोचते. तेव्हा तिचं लक्ष समोर उभा असलेल्या अनिरुद्धकडे जातं. त्यानंतर तिच्या डोक्यात विचार सुरु होतात आणि पुढे ती जमिनीवर बेशुद्ध होऊन पडते. असं मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. संजनाला नेमकं कायं झालंय? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
संजना अचानक बेशुद्ध झाल्याने मालिकेत नवा ट्विस्ट येणार असल्याचा अंदाज प्रेक्षकांकडून वर्तवला जात आहे. दरम्यान, संजनाची भूमिका साकारणाऱ्या रुपाली भोसलेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच तिनं हिंदी मालिकांमध्ये काम करून आपला ठसा उमटवला आहे. शिवाय ती बिग बॉस मराठीतही झळकली होती.