स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. या मालिकेतील कलाकारांच्या चाहतावर्गामध्येही प्रंचड वाढ झाली आहे. ‘आई कुठे काय करते’मध्ये अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकरची तर सोशल मीडियावर जोरदार चर्चा असते. आताही तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मधुराणी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे कामाबरोबरच तिच्या खासगी आयुष्याबाबतही भाष्य करताना दिसते. आताही ती कोणत्या शाळेत शिकली? तिची शाळा कोणती? हे तिने व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं आहे. मधुराणी बऱ्याच वर्षांनंतर तिने ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं त्या शाळेमध्ये गेली होती. यादरम्यानचाच व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला.
मधुराणीने व्हिडीओ शेअर करत तिच्या शाळेची झलक दाखवली.मधुराणीने म्हटलं की, “शालामाते, तुझेच सारे अगणित हे उपकार वंदन सादर जिला सदाचे, त्रिवार जय जयकार. माझी शाळा, हुजुरपागा, पुणे. आज मी जे काही करतेय, करू शकतेय ते केवळ माझ्या शाळेमुळे. माझ्या शाळेने, शिक्षकांनी माझ्यातले कलागुण खऱ्या अर्थाने जोपासले, वेळोवेळी प्रोत्साहन दिलं.”
“कलेवर, भाषेवर प्रेम करायला शिकवलं. शिस्त शिकवली. कणखरपणा शिकवला. आम्हा सगळ्या हुजूरपागेच्या कन्यांना काल माझ्या बॅचच्या मैत्रिणींनी छानसा कार्यक्रम शाळेत ठेवला होता. त्यानिमित्ताने खूप वर्षांनी पुन्हा शाळेत जाणं झालं. त्या वास्तुला पुन्हा एकदा बिलगले. किती वर्षे लहान झाले. भरून आलं.” मधुराणीने पुण्याच्या शाळेमध्ये आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.