स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. या मालिकेचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. पण मध्यंतरी या मालिकेमध्ये अरुंधतीचा लेक अभिषेकचेही दुसऱ्या स्त्रीबरोबर संबंध असल्याचं दाखवण्यात आलं. त्यानंतर मालिकेवर प्रेक्षक संतापले होते. आता असाच काहीसा एक प्रकार घडला आहे.
आणखी वाचा – Video : “बाबा तू ये ना” वडिलांना पाहून चिमुकल्याच्या भावना अनावर, आरोह वेलणकरच्या लेकाने सगळ्यांनाच रडवलं
‘आई कुठे काय करते’च्या नव्या भागामध्ये अभिषेकच्या वागण्यामुळे कोलमडलेली त्याची पत्नी अनघाला अरुंधती आधार देते. अनघाचे सांत्वन करताना तिच्यासाठी अंगाई गाते. ‘एकदा काय झाले’ या चित्रपटातील “बाळाला झोप का गं येत नाही” ही अंगाई अरुंधतीने गायली. हा चित्रपट मराठीतील सुप्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केला आहे. ही अंगाईही त्यांनीच लिहिली आहे.
सलील कुलकर्णी यांनी मालिकेतील अरुंधतीचा अंगाई व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करत मधुराणी गोखलेचं कौतुक केलं. दरम्यान त्यांच्या या पोस्टवर एका युजरने कमेंट केली की, “गाणं छान आहे पण मालिका अत्यंत भंगार.”
या युजरला सलील कुलकर्णी यांनी अगदी सडेतोड उत्तर दिलं आहे. ते या कमेंटला उत्तर देत म्हणाले, “ही कमेंट तुम्ही वाहिनीच्या किंवा मालिकेच्या अकाऊंटवर करायला हवी. बरोबर ना?” नेटकऱ्यांनी मात्र अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखलेच्या या व्हिडीओचं कौतुक केलं आहे.