काही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करतात. कधी त्यातील पात्रे लाडकी होतात, तर कधी मालिकेचे कथानक मनाला स्पर्शून जाते. जवळची गोष्ट असली तर मालिका प्रेक्षकांच्या रोजच्या आयुष्यातील एक भाग होते. अशा मालिका जेव्हा संपतात, प्रेक्षकांचा निरोप घेतात, त्यावेळी सहाजिकच प्रेक्षकांना वाईट वाटते. अशीच एक लाडकी मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचे नाव ‘आई कुठे काय करते’ असे आहे. या निमित्ताने मालिकेत कांचन देशमुखची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी एका मुलाखतीत मालिकेविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाल्या अर्चना पाटकर?

अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी ‘अल्ट्रा मराठी बझ’ या यूट्यूब चॅनेलबरोबर संवाद साधला. यावेळी त्यांनी मालिकेविषयी बोलताना म्हटले, “मी इथली प्रत्येक गोष्ट मिस करणार आहे. पाच वर्षे मोठा कालावधी आहे. चांगल्या-वाईट बऱ्याच आठवणी आहेत. वाईट अशा की, ट्रॅफिकमध्ये अडकले.”

मालिका संपल्यानंतर सर्वात जास्त कोणाची आठवण येईल? असे विचारल्यानंतर अर्चना पाटकर म्हणाल्या, “आम्ही पाच वर्षे एकत्र होतो. कोणाला मिस करणार असं सांगता येणार नाही. घरी झोपायला तीन-चार तास असायचे ते तेवढेच. कारण सुरुवातीचे आमचे दीड-दोन वर्षे सकाळी ७ वाजता मी सेटवर पोहोचायचे. त्यासाठी साडेपाच-पाऊणे सहाला निघायचे. रात्री दहा-अकाराला पॅकअप झाल्यानंतर रात्री दीड-दोन वाजता पोहोचायचे. तीन ते चार तास झोप मिळायची. बाकी अख्खा दिवस आम्ही इथेच असायचो, त्यामुळे हे दुसरं घर झालं होतं किंवा हेच पहिलं घर झालं होतं आणि ते दुसरं झालं होतं; त्यामुळे इथल्या प्रत्येकाशी इतकी जवळीकता आहे. कलाकार तर आहेतच. सेटिंग, मेकअप, प्रत्येक डिपार्टमेंट असो, त्यामुळे मी सगळ्यांना मिस करेन”, असे म्हणत अर्चना पाटकर यांनी सगळ्यांची आठवण येईल असे म्हटले आहे.

समृद्धी घरातील आवडणारी जागा कोणती? या प्रश्नाचे उत्तर देताना अर्चना पाटकर यांनी म्हटले, “मला माझी रूम आवडते. मी आणि अनघा आम्ही दोघी गप्पा मारतो. आमची चर्चा कोणत्याही विषयावर चालते आणि बऱ्याच गोष्टी ज्या नवीन असतात, त्या मला तिच्याकडून कळतात, कधी माझ्याकडून तिला कळतात. देवाणघेवाण सुरू असते.”

हेही वाचा: ५ वर्षांनी मालिका संपली, सेट तुटला…; ‘आई कुठे काय करते’ फेम अनिरुद्धची भावुक पोस्ट; सेटवरची ‘ही’ गोष्ट आणली स्वत:च्या घरी

दरम्यान, अर्चना पाटकर यांनी मालिकेत अनिरुद्धची आई आणि अरुंधतीची सासू ही भूमिका साकारली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाल्याचे पाहायला मिळाले.