छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून ‘आई कुठे काय करते.’ कडे पाहिले जाते. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत येणाऱ्या ट्वीस्टमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. ही मालिका टीआरपीच्या यादीत कायमच पहिल्या क्रमांकावर असल्याचे पाहायला मिळते. सध्या या मालिकेत अनिश हा ईशाच्या लग्नासाठी मागणी घालताना दिसत आहे. पण त्याला अनिरुद्ध हा कडाडून विरोध करताना दिसत आहे. नुकतंच या निमित्ताने अभिनेते मिलिंद गवळींनी मुलींना एक मोलाचा सल्ला दिला आहे.
मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात मलिकेच्या आगामी भागातील एक व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे. या व्हिडीओला त्यांनी हटके कॅप्शन देत अनेक मुलींना बाप म्हणून मोलाचा सल्ला दिला आहे.
आणखी वाचा : Video : बँकॉकच्या रस्त्यावर शंकर, पार्वती आणि गणपतीची मूर्ती पाहून अनुपम खेर म्हणाले, “भारताच्या देवी-देवतांचे…”
मिलिंद गवळींची पोस्ट
“एका बापाची व्यथा अनिरुद्ध च्या माध्यमातून मांडली जात आहे, अनिरुद्ध खूप चुकीचा वागतो आहे, एका चांगल्या कार्यात विघ्न आणतो आहे असं सगळ्यांनाच वाटणं साहजिक आहे.पण खरंच विचार केला तर अनिरुद्ध च म्हणणं अगदी बरोबर आहे, अनिरुद्ध म्हणतोय जोपर्यंत माझी मुलगी तिच्या पायावर उभी राहत नाही , ती तिचं शिक्षण पूर्ण करत नाही , तिला आयुष्यामध्ये जे करायचं आहे ते स्वप्न ती पूर्ण करत नाही , तोपर्यंत लग्नाच्या बेडीत तिला अडकवायचं नाही.
बाप म्हणून त्याला त्याची मुलगी खूप चांगली माहिती आहे, दोन वेळा ती प्रेमात फसली आहे, आता त्याचा तिच्या या प्रेमावर विश्वास नाही, त्याचं म्हणणं आहे की साखरपुडा झाल्यानंतर कशावरून यश आणि गौरी सारखा तिचाही साखरपुडा मोडणार नाही, त्याचं म्हणणं आहे की आधी शिक्षण पूर्ण करा, आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावर उभे रहा, आणि मगच हा लग्नाचा विचार करा, अनिरूद्ध असेही म्हणतो की , मुलगा पण अजूनही सेटल झालेला नाही , तोही अजूनही शिकतो आहे, मग एवढ धाई कशासाठी, अनिरुद्ध बाप म्हणून कुठेही चुकत नाही आहे कदाचित त्याची ही समजावण्याची पद्धत खूप चुकीची आहे.
पण ती अनिरुद्ध ची पद्धत आहे , तो वेगळा वागूच शकत नाही वेगळ्या पद्धतीने अनिरुद्ध समजावू शकत नाही.
मुलीवर अतोनात प्रेम करणारा , तिच्यावर जीव लावणारा , तिच्यासाठी खूप मोठी स्वप्न बघणारा हा अनिरुद्ध आता पुढे काय करतोय, हे बघायला खूपच मजा येणार आहे. पुढचे सीन्स मी शूट केलेले आहेत, जे मला स्वतःला खूप भावले आहेत , पण ते मी तुम्हाला सांगू शकत नाही”, असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे.
आणखी वाचा : “शिर्डीच्या साईबाबांनी नवसाने मुलगा दिला, मुंबईच्या महालक्ष्मीने मुंबईत…” मिलिंद गवळींची भावूक पोस्ट
दरम्यान मिलिंद गवळींच्या या पोस्टला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. यातील काहींनी मिलिंद गवळींच्या पोस्टवर कमेंट करत त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. तर काहींनी अनिरुद्धचे पात्र त्यांना आवडत नसल्याचेही सांगितले आहे.