छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. मालिकेतील देशमुख कुटुंब प्रेक्षकांना आपलंसं वाटतं. अभिनेता मिलिंद गवळी या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारत आहेत. ‘आई कुठे काय करते’ मालिकेला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने मिलिंद गवळी यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन खास पोस्ट शेअर केली आहे.
मिलिंद गवळी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘आई कुठे काय करते’च्या संपूर्ण टीमबरोबरचा सेटवरील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी खास पोस्ट लिहिली आहे.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या प्रवासाला तीन वर्ष पूर्ण झाली. तीन वर्ष ज्या सैनिकांबरोबर लोकांचे मन जिंकण्याची लढाई लढलो. त्यातल्या काही सैनिकांबरोबर तीन वर्षाचा आढावा घेण्यासाठी अमोध पोंक्षे आणि Qench चे अवधूत यांनी एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. तीन वर्ष मागे वळून भक्तांना सगळ्यांनाच भरभरून बोलायचं होतं.
आमचे निर्माते राजनशाही दिग्दर्शक रवी करमरकर, लेखिका नमिता वर्तक, संवाद मुग्धा गोडबोले रानडे माझे सर्व सहकलाकार सगळ्यांसाठीच हा प्रवास फार अविस्मरणीय असाच होता. प्रत्येक जण एकेक पुस्तक लिहेल इतके अनुभव प्रत्येकाच्याच गाठीशी आहेत. आमच्या दिग्दर्शकाने पहिल्या दिवशी त्यांना असलेली भीती बोलून दाखवली. नमिताने तिच्यावर निर्माते राजन साई यांचा असलेला विश्वास बोलून दाखवला. कलाकाराने त्यांचे त्यांचे अनुभव बोलून दाखवले.
प्रत्येकाकडे खूप काही साठवून ठेवलेलं आहे, असं मला जाणवलं. एक गोष्ट सगळ्यांच्या मनात सारखी होती ती म्हणजे या तीन वर्षात आम्हाला एक छानसं कुटुंब मिळालं. प्रत्येकामध्ये असंख्य रुसवे फुगवे आनंदाचे क्षण चिडचिडचे रागाचे क्षण हवे हवे असे वाटणारे नको नकोसे झालेले क्षण. या सगळ्या अनुभवातून सगळेच जण गेले आहेत. सगळ्यांनाच सगळ्यांबद्दल सगळंच माहीत झालेलं आहे. एकमेकांचे गुण-दुर्गुण पाहिलेले आहेत. प्रत्येकाने एकमेकांची चेष्टा मस्करी करून झालेली आहे. आता तीन वर्षानंतर अशी परिस्थिती आहे…“तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना”.
‘आई कुठे काय करते’ हा हिमालय चढण्याचा प्रवास हा एकमेकांच्या आधाराने एकमेकांच्या साथीने, एकमेकांचा हात धरूनच पार करता येईल याची सगळ्यांनाच जाणीव आहे. या साखळीतला एक जरी निखळला तर पत्त्याच्या डोंगरासारखे सगळेच खाली येऊ आणि त्याचं आमच्यापैकी कोणालाही ओझं वाटत नाही. कारण प्रेक्षकांचे इतकं भरभरून प्रेम जे मिळत आहे. तीच आम्हा सर्वांची प्रेरणा आणि ऊर्जा आहे.
मिलिंद गवळी यांनी पोस्टद्वारे ‘आई कुठे काय करते’बाबत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.