स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेत अरुंधतीची मैत्रिणी देविका हे पात्र साकारणारी अभिनेत्री राधिका देशपांडे ही कायमच चर्चेत असते. ती कायमच विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या पोस्ट शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी राधिका देशपांडेने टिकली वादावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर आता तिने फटाक्यांवर भाष्य केले आहे.
मराठी अभिनेत्री राधिका देशपांडे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ती काम करताना दिसत आहे. या मालिकेत अरुंधतीची सर्वात जवळच्या आणि लाडक्या मैत्रिणीचे पात्र तिने साकारले आहे.
आणखी वाचा : “कशाला पाहिजे टिकली फिकली…” मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
राधिका देशपांडेची इन्स्टाग्राम पोस्ट
दिवाळीत आपण सगळेच फटाके उडवतो. हो आपण सगळेच. नाही म्हणजे अगदी सगळेच नाही. म्हणजे बघा ना… टिकली पासून तर फुलझड्या, साप, अनार, चक्र, सुतळी बॉम्ब, लड, रॉकेट, टू शॉट, सेव्हन शॉट, लवंगी फटका इत्यादीन पैकी एक दोन तरी उडवतोच उडवतो. अहो, पिढ्यानपिढ्या उडवत आलो आहोत आपण फटाके.
हं… आता “ह्या वर्षी उडवणार का फटाके?” म्हंटल्यावर उडवा उडवीची उत्तरं मिळाली आहेत म्हणा. का? दूषित वातावरणामध्ये प्रदुशितांना फटाक्यांमधले दोष आढळून आले त्यामुळे कोणी कितीही उपोषणाला बसलं तरी चालेल पण तुम्ही फटाक्यांच्या बाबतीत कुपोषित असायला हवे. का?… करणं ठरलेली आहेत. दिवाळीतल्या दिवसांमध्ये फटाक्यांनीच प्रदूषण वाढतं.
फटाक्यांचा मोठा आवाज होतो. फटाक्यांमधला दारूगोळा हानिकारक असतो. वायुप्रदूषण होऊन खोकला, दम्याचा त्रास होतो. लहान मुलांना आगीशी खेळ खेळायला देणं चांगलं नाही. शास्त्रात कुठे लिहिलं नाही फटाके उडवा. फटाक्यांचा कचरा होतो. त्यामुळे फटाके बंद. चीडी चूप. हाताची घडी तोंडावर बोट. त्यामुळे फटाके फक्त फराळ करताना डायनिंग टेबलवर बसून त्यांचा चोथा होईस तोवर आपण संपवले.
काय होते ते दिवस जेंव्हा हातात फुलझडी घेऊन आम्ही भाऊबीज साजरी करायचो. वडिलांबरोबर अनार लावत पाडवा साजरा करायचो. लड लावताना आजी ओरडायची “जरा जपून रे बाळांनो”. रॉकेट लावताना वरच्या मजल्यावरच्या काकू म्हणायच्या “थांबा रे पोरांनो, मी आधी खिडकी बंद करते. मग उडवा किती उडवायचे ते.” तो दारुगोळ्याचा वास आणि धूर काळ्याकुट्ट रात्री सर्वत्र पसरायचा आणि आपण एकदम योद्धा होऊन शौर्य गाजवल्या सारखं वाटायचं. पण आता? नाही हो. आता नं अपराध्या सारखा फील येतो. एखादी फटाक्यांमधली बंदूक जरी घरी ठेवली तरी अटक होईल की काय असं वाटतं. दारूगोळ्याच्या वासानं अवकाशात विष पेरल्या सारखं वाटतं. दूषित होतं वातावरण दिवाळीमुळे.
हिंदू राष्ट्र हे शांतता प्रिय आहे. ते ऊट सूट परराष्ट्रावर फणा काढत नाही. किंवा झडप मारून, हिसकावून, ओरबाडून, आपले नियम लादून राज्य करत नाही. गरज असली तर शिकार आणि वेळ आलीच तर गर्जना करणारं सिंह राष्ट्र आहे. ह्या सिंहाचं तोंड दाबून धरणं काय सोपं वाटलं? सिंह गर्जना करणार. आता हिंदू शांत बसत नाही. जिथे दाबायचा प्रयत्न कराल तिथे तो डरकाळी फोडणार, आवाज होणार, असे राधिका देशपांडेने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा : “२० टक्के वाढीसाठी…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतर ओंकार भोजनेवर चाहते नाराज
दरम्यान सध्या राधिका ही या मालिकेत दिसत नाही. त्यामुळे तिने ही मालिका सोडल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे आई कुठे काय करते या मालिकेत अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. राधिकाने यापूर्वी अनेक मराठी नाटक आणि चित्रपटात काम केली आहे. ‘व्हेनिला स्ट्राबेरी अँड चॉकेलट’, ‘होणार सून मी या घरची’, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ सारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं आहे.