मराठी मालिकाविश्वातील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘आई कुठे काय करते.’ या मालिकेने पाच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. महाराष्ट्राच्या घराघरात ही मालिका पोहोचली. या मालिकेतील कलाकारांनी आपापली पात्र उत्तमरित्या निभावली. त्यामुळे आजही ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकारांना त्यांच्या पात्रांवरून अधिक ओळखलं जात. गेल्या वर्षी ३० नोव्हेंबर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण, तरीही या मालिकेतील कलाकार नेहमी चर्चेत असतात. लवकरच ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेता नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याबाबत त्याने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिकेत यशच्या भूमिकेत झळकलेला अभिषेक देशमुख आता रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. ‘वजनदार’ या नाटकातून तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नाटकात अलका कुबल, साक्षी पाटील, अभय जोशी, पूनम सरोदे या कलाकारांबरोबर दिसणार आहे. २४ एप्रिलला अभिषेकच्या ‘वजनदार’ नाटकाचा शुभारंभ होणार आहे. यानिमित्ताने अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे.
नाटकातील कलाकारांबरोबरचे आणि नाटकाच्या पोस्टरचा फोटो शेअर करत अभिषेक देशमुखने लिहिलं, “आमचं नवीन नाटक ‘वजनदार’…नाटकाचा शुभारंभ २४ एप्रिल पासून होतोय…पाठीशी अष्टविनायक आणि विप्रा क्रिएशन्स सारख्या भक्कम निर्मिती संस्था आहेत आणि विशेष म्हणजे अलकाताईं २७ वर्षांनंतर एका वेगळ्या भूमिकेत भेटीला येणार आहेत. त्यांच्याबरोबर नाटकाची तालीम करणं हा कमाल अनुभव आहे. त्यांचं काम, मेहनत आणि संपूर्ण प्रोसेसमध्ये त्यांच्याबरोबर असणं, त्यांच्यातला गोडवा हे सकारात्मक ऊर्जा देणारं आहे…तसंच अभय जोशी हे नाट्यक्षेत्रातला दांडगा अनुभव असलेले नट तेही नाटकात एक छान पात्र साकारत आहेत.”
पुढे अभिषेक देशमुखने लिहिलं की, संतोष वेरूळकर…आमचे दिग्दर्शक. ‘ग म भ न’, ‘बारोमास’, ‘लंडनच्या आज्जीबाई’, ‘आषाढ बार’ अशा अनेक गाजलेल्या नाटकांचं, एकांकिकांचं वलय असलेल्या, कसलेल्या, दिग्दर्शक कलाकाराबरोबर काम करायला मिळणं म्हणजे पर्वणीच! आमच्या लेखिका संपदा जोगळेकर कुळकर्णी…थँक्यू सो मच…तू या नाटकाची ‘ममा’ आहेस. प्रत्येक प्रसंग, वाक्य न वाक्य मनाचा ठाव घेणारं आहे, ते पोहोचवताना कस लागतोय, शिकायला मिळतंय. तसंच सचिन गावकर याचं नेपथ्य, मंदार देशपांडे याचं संगीत, हर्षदाताई बोरकर यांची वेशभूषा, अमोघ फडके याची प्रकाश योजना, सुत्रधार प्रणित बोडके आणि धन्यवाद संध्याताई रोठे , प्रांजली रोठे, दिलीप दादा जाधव…सोबत साक्षी पाटील आणि पुनम सरोदे या मेहनती कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेतच, सहदिग्दर्शक ओमकार मसूरकर…सोबत संदिपदादा जाधव, अदित्य, प्रथम, निर्मल बर्वे…भेटूया…लवकरच…सहर्ष…सविनय सादर करत आहोत…’वजनदार’.”
दरम्यान, अभिषेक देशमुखच्या या पोस्टवर इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री रुपाली भोसले, सुमंत ठाकरे, अलका कुबल, शंतनु मोघे, सीमा घोगळे आणि पत्नी कृतिका देव यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.