Aai Kuthe Kay Karte: ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. मालिकेचा हा अंतिम आठवडा आहे. गेल्या पाच वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे सध्या मालिकेतील कलाकार खूप चर्चेत आहेत.
नुकताच ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्रामवर ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील यश देशमुख म्हणजेच अभिनेता अभिषेक देशमुखचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिषेकने एका कार्यक्रमातील एक किस्सा सांगितला आहे. अभिषेक म्हणाला, “‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेने मला काय दिलं? थोडक्यात आईनं मला काय दिलं? एका कार्यक्रमात एक काकू मला भेटल्या आणि त्यांनी त्यांच्या मुलीची माझ्याशी ओळख करून दिली. त्या म्हणाल्या, तू जसा अरुंधतीचा यश तसा हा माझा यश.”
“आई मुलांना नेहमीच साथ देते. पण खूप कमी मुलं असतात, आईला समजून घेतात, तिची साथ देतात. पण, हा यश आईची साथ देणारा आहे आणि समजून घेणारा आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे माझ्यासारख्या कित्येक मुलांना त्यांच्या आईबरोबरचं नातं नव्याने जोडता आलं. या नात्याच्या शेवटच्या क्षणाचे साथीदार होऊयात आणि बघूयात ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या निरोपाचे अंतिम भाग,” असं अभिषेक देशमुख म्हणाला.
दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिका डिसेंबर २०१९पासून सुरू झाली. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. या मालिकेतील अरुंधती ही मध्यवर्ती भूमिका महिलांसाठी आयडॉल ठरली. त्याचप्रमाणे इतर पात्रांनी देखील प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यापैकी एक म्हणजे यश देशमुख. अभिषेक देशमुखने हे पात्र उत्त्कृष्टरित्या साकारलं. त्यामुळे आज अभिषेकला यश म्हणून अधिक ओळखलं जातं.
‘आई कुठे काय करते’ मालिकेची जागा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही नवी मालिका घेत आहे. २ डिसेंबरपासून दुपारी २.३० ही नवी मालिका सुरू होणार आहे. या नव्या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तसंच ‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर आणखी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘लग्नाची बेडी’ ही मालिका ऑफ एअर होणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd