‘आई कुठे काय करते’मधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून अश्विनी महांगडेला ओळखले जाते. या मालिकेत तिने अनघा हे पात्र साकारले आहे. ती नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. नुकतंच तिने तिच्या वडिलांबद्दल भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अश्विनी महांगडेने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोशूटमध्ये मागे काही लाकडं दिसत आहे. यानिमित्ताने तिने तिच्या वडिलांबद्दल सांगितले आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
आणखी वाचा : “मराठी कलाकार एका टेकमध्ये…”, शशांक केतकरचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाला “शूटींगच्या ठिकाणी…”

अश्विनी महांगडेची पोस्ट

“गोष्ट एका लाकूडतोड्याची…
काही फोटोशूट हे अर्थपूर्ण असतात. हे फोटोशूट मी माझ्या घरी केले. आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मागे लाकूड आहे, जळण पडलंय, कसली तरी मशीन आहे आणि हे कसले घर? #नाना (माझे वडील) यांनी सुरुवातीच्या काळात कामधंदा सुरू करताना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला पण जम बसला नाही तरीही प्रयत्न मात्र थांबले नाहीत. त्यावेळी कुणाच्या तरी शेतातील सुकलेले झाडं, शेतात बांधावर असलेले बाभळीचे झाड ते विकत घेवु लागले आणि सुरू झाला माझ्या बापमाणसाचा #लाकूडतोड्या हा व्यवसाय. अतिशय कष्टाचा हा व्यवसाय. तेव्हा गॅस नव्हते त्यामुळे चुलीसाठी जळण, घर बांधण्यासाठी फळ्या, आणि #मयतीसाठी_जळण असा त्याचा वापर व्हायचा. या कामात त्यांची साथ माझ्या मम्मीने तर दिलीच पण त्याहीपेक्षा जास्त साथ ही त्यांच्या आईने #लक्ष्मीबाई हिने दिली. रोज #वखारित जावून बसायला लागायचे. ते काम आज्जी करायची. १-१ पैशाचा हिशोब रात्री ती नानांना सांगायची.

नाना खूप अभिमानाने सांगायचे की मी #लाकूडतोड्या आहे आणि मला आपली लोखंडाची कुऱ्हाडच प्रिय. एक उत्तम कलाकार असूनही केवळ आपल्या कुटुंबासाठी,पोटापाण्यासाठी वेगळे क्षेत्र निवडून त्यावर प्रेम केले आणि त्याचा आम्हालाही आदर आहे. मयतीसाठी लागणारे लाकूड ही आपल्यासाठी फार साधी गोष्ट असेल पण त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची. कारण मेलेल्या माणसाला अग्नी दिल्यानंतरच त्याची मुक्ती होते आणि त्यासाठीचे एक महत्त्वाचे काम आपण करतो असे ते समजायचे. आता आम्ही सुद्धा तेच मानतो.

कोरोनाच्या काळात कुणीही नातेवाईक साध्या आजाराने जरी कोणाचा मृत्यू झाला तरी खांदा द्यायला तयार नव्हते. त्यावेळी ते कामही नानांवर पडले किंवा त्यांनी ते स्वीकारले. आणि मृतदेह आमच्या पीकअप मधून घेवून जाणे हे एक काम वाढले. नानांनी हे काम करावे अशी माझी इच्छा अजिबात नव्हती कारण यात त्यांना कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. पण त्यांना असे कायम वाटायचे की हे देवाने माझ्यावर जबाबदारीने टाकलेले काम आहे.

हे काम त्यांनी शेवटपर्यंत केले आणि यातच त्यांना कारोना झाला. वखार आजही आहे. त्यांच्याशिवाय पण त्यांच्या तत्वांवर. हळूहळू अनेक गाड्या आल्या, वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी संधी शोधल्या आणि काम सुरू केले पण आजही एक काम निष्ठेने केले जाते आणि ते म्हणजे मयतीसाठी जळण दिलं जातं. मम्मी म्हणते यात फायदा नाही झाला तरी हे काम बंद नाही करायचे कारण हीच आपली सुरुवात आहे आणि सेवा.

महालय/ महाळाचा पंधरवडा सुरू होईल. ४ माणसं घरी येतील, जेवतील. पण गेलेल्या माणसाचे विचार हे सगळ्यात महत्वाचे आहेत. ते किमान आपल्या त्या ४ माणसांपर्यंत पोहोचवायला हवे. नातवंडांना तरी समजायला हवे”, अशी पोस्ट अश्विनी महांगडेने केली आहे.

आणखी वाचा : “दोन-अडीच तास…”, ‘तीन अडकून सीताराम’ चित्रपट पाहिल्यावर सुबोध भावेची प्रतिक्रिया

दरम्यान अश्विनीच्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहे. तिच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊसही पडताना दिसत आहे. सध्या तिची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame actress ashwini mahangade share post about his father corona nrp