Aai Kuthe Kay Karte : गेली पाच वर्षे ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या मालिकेतील संपूर्ण कथा ‘आई’वर आहे. आई तिच्या मुलांसाठी, घरासाठी काय काय कष्ट घेते हे कायम मालिकेत दाखवण्यात आलं आहे. या मालिकेत आईची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर साकारत आहे. मधुराणीबरोबर मालिकेतील अन्य सर्वच कलाकारांनी त्यांना दिलेली पात्र अगदी चोखपणे बजावली आहेत.
‘आई कुठे काय करते’ पुढील तीन दिवसांत म्हणजे ३० नोव्हेंबरला संपणार आहे. मालिका संपणार असल्याने प्रत्येक कलाकार या मालिकेच्या त्यांच्या आयुष्याशी जोडलेल्या आठवणी आणि किस्से सांगत आहेत. मालिकेत पात्र साकारताना आपल्याला काय काय मिळालं हे सर्वच कलाकारांनी सांगितलं आहे. आशात आता या मालिकेत काम करताना कलाकार म्हणून कोणता सीन शूट करणे सर्वात कठीण गेलं, याबद्दल अभिनेत्री अश्विनी महांगडेने उत्तर दिलं आहे.
हेही वाचा : सेटवर कोणाशी खास बॉण्ड तयार झाला आहे? ‘आई कुठे काय करते’मधील अप्पा म्हणाले, “माझा स्पेशल बॉण्ड…”
स्टार प्रवाह वाहिनीवर याचा एका व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अश्विनी महांगडेला सर्वात कठीण सीनबद्दल प्रश्न विचारला आहे. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “खरं तर रवी सर सर्वकाही इतकं छान करून घेतात, त्यामुळे आतापर्यंत असं वाटलं नाही. पण, मी या मालिकेत येण्याआधी काही ऐतिहासिक मालिकांमध्ये काम करत होते. त्यानंतर जेव्हा मी ‘आई कुठे काय करते’मध्ये आले, तेव्हाही मी बऱ्यापैकी आधीच्या पद्धतीनेच बोलत होते. पण, यातही मला जास्त कठीण काही वाटलं नाही, कारण सर्वांनी मदत केली आणि रवी सरांनी काम सोपं करून शिकवलं.
हेही वाचा : ऐश्वर्या नारकर यांच्या सौंदर्याचं आणि फिटनेसचं रहस्य काय? व्हिडीओ शेअर करत स्वत: दिली माहिती
‘आई कुठे काय करते’ मालिकेत अश्विनी महांगडे अनघा हे पात्र साकारत आहे. अनघा म्हणजे अरुंधतीची मोठी सून आणि अभिची बायको. घरातील मोठी सून असल्याने अनघा नेहमीच कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेताना दिसते. अरुंधती ज्या पद्धतीने सर्वांवर माया करते, त्याच पद्धतीने अनघादेखील घरात प्रत्येक व्यक्तीची आवड निवड जपताना दिसते, त्यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांसाठी अनघा हे पात्रसुद्धा फार खास आणि महत्त्वाचं आहे. तसेच अभिनेत्री अश्विनी महांगडेने या पात्राला पूर्णत: न्याय दिला आहे.