‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे अभिनेत्री अश्विनी महांगडे घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये तिने राणू अक्कांची भूमिका साकारली होती. सध्या अश्विनी ‘स्टार प्रवाह’च्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. परंतु, अभिनय क्षेत्र सांभाळून वैयक्तिक आयुष्यात अश्विनी सामाजिक संस्थेसाठी काम करते. शिवरायांचे विचार, सध्याची परिस्थिती, मराठा आरक्षण या सगळ्याच मुद्द्यांवर अश्विनी स्वत:चं स्पष्ट मत मांडत असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजकीय मुद्द्यांवर नेहमीच परखड मत मांडत असल्याने अश्विनीला नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत राजकारणात येणार का? याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, “मी राजकारणात आताही आहे कारण, मी एक मतदार आहे. मतदार हा राजकारणातील सर्वात मोठा भाग आहे. कोणी आमदार आहेत, कोणी खासदार आहेत पण, यापेक्षा यांना निवडून देणारा मतदार हा सगळ्यात मोठा असतो. त्यामुळे पुढे जाऊन मला संधी मिळाली, तर लोकांसाठी काम करायला मला नक्की आवडेल. यामुळे माझाही आवाका वाढेल.”

हेही वाचा : “तुझी आठवण सदैव…”, माधुरी दीक्षितची आईसाठी भावुक पोस्ट, म्हणाली…

“राजकीय गाभा मला माझ्या वडिलांपासून लाभलेला आहे. कारण, अगदी सरपंच पदाच्या निवडीपासून ते खासदारकीपर्यंत प्रत्येक गोष्टीत ते सहभागी असायचे. वडिलांच्या मागे प्रत्येक गोष्टीत आम्ही सुद्धा सहभागी व्हायचो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी घरातच शिकलेय. संधी मिळाली तर राजकारणात एक वेगळा अपवाद तयार करायला मला नक्कीच आवडेल. पण, सध्याची परिस्थिती फार वेगळी आहे. अशावेळी मी नेमकी कोणती विचारधारा स्वीकारावी याचा प्रश्न पडतो. आपला भारत हा सगळ्या जाती-धर्मांना एकत्र घेऊन जाणारा देश आहे. पण, आता आपण आपापसांत एवढी भांडणं करतो की, एकत्र कधी येणार? इतर गोष्टींवर कधी चर्चा करणार असा प्रश्न मला पडतो. त्यामुळे या सगळ्यावर मला बोलायची संधी मिळाली, तर निश्चितपणे आवडेल.” असं अश्विनीने सांगितलं.

हेही वाचा : चुलीवरचं जेवण, प्रशस्त जागा अन्…; ‘नवरा माझा नवसाचा’ फेम अभिनेत्याचं मुंबईत आहे फार्महाऊस, सर्वसामान्यांसाठी केलं खुलं

दरम्यान, अश्विनी महांगडे सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघा ही भूमिका साकारत आहे. याशिवाय लवकरच अभिनेत्री ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame actress ashwini mahangade shares opinion about joining political party sva 00