Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने सलग पाच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आता ही मालिका संपणार असून, शेवटच्या भागाचे शूटिंगदेखील संपत आले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अरुंधती या पात्राने प्रत्येकाच्या मनात घर केले आहे. सध्या यातील सर्वच कलाकार त्यांना आईने म्हणजेच या मालिकेने नेमके काय दिले? हे सांगत आहेत. सेटवरील गमती-जमती आणि चाहत्यांचे काही मजेशीर किस्सेदेखील कलाकार चाहत्यांबरोबर शेअर करत आहेत. मालिकेत आईची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने साकारली आहे.
या भूमिकेमुळे मधुराणी प्रभुलकरचा चाहता वर्ग फार वाढला. चाहत्यांना आवडत्या कलाकाराच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घ्यावी, असे वाटते. तसेच कलाकार भेटल्यावर त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करताना काय बोलावे आणि प्रेम कसे व्यक्त करावे हे काहींना समजत नाही. त्यामुळे गडबडीत काही मजेशीर किंवा हास्यास्पद किस्से तयार होतात. असेच काहीसे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरबरोबरसुद्धा घडले आहे. अभिनेत्रीने तिच्याबरोबर घडलेला हा प्रसंग अरुंधती पात्रासाठीची सर्वोत्तम प्रतिक्रिया सांगताना शेअर केला आहे.
हेही वाचा : “मी परफेक्ट बाबा नाही, पण…”, मोठ्या लेकाच्या वाढदिवशी रितेश देशमुखने व्यक्त केल्या भावना; शेअर केले खास फोटो
त्यात मधुराणी म्हणते, “गेल्या वर्षी एका दुकानात मी मुलीसाठी दिवाळीला शॉपिंग करण्यासाठी गेले होते. त्यावेळी एक बाई तेथे आली होती. तिच्या हातात एक बाळ होतं. त्यावेळी ती मला पाहून म्हणाली की, माझी मुलगी तुमची खूप मोठी फॅन आहे. त्यामुळे मी तिच्या आजूबाजूला पाहू लागले… की, कुठे आहे तुमची मुलगी. त्या महिलेनं मला तिच्या कडेवर असलेलं बाळ दाखवलं आणि म्हणाली ही काय…”
त्यावर मधुराणी प्रभुलकर हसत म्हणाली, “ही माझी फॅन आहे… तेव्हा त्यावर ती महिला म्हणाली की, हो… ती पोटात असल्यापासून मी तुमची मालिका पाहते आणि ती आता रडतानासुद्धा आईssई… अशी रडते…” असे मधुराणी प्रभुलकरने हा किस्सा सांगताना म्हटले.
हेही वाचा : Bigg Boss 18: रजत दलाल आणि दिग्विजय सिंह राठी यांच्या मैत्रीत पडली फूट, पाहा नवा प्रोमो
“लोकांनी फार जिवापाड आणि मनापासून आईवर (मालिका) प्रेम केलं आहे. हे काय आहे, ते मी शब्दांत सांगूच शकत नाही. ज्या व्यक्तींची आई या जगात नाहीये, त्या व्यक्ती अरुंधतीमध्ये त्यांची आई शोधतात, हे सर्व काही मला अगदी मोठी जबाबदारी असल्यासारखं वाटतं”, असेही मधुराणी प्रभुलकरने व्हिडीओच्या शेवटी सांगितले.