एखाद्या मालिकेतील पात्र, भूमिका या मालिकेत अल्प काळासाठीच असतात. पण तरीही त्या कायमचे प्रेक्षकांच्या मनात घर करतात. अशीच प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलेली एक भूमिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतील ‘देविका’. या मालिकेत अरुंधतीची सर्वात जवळची आणि लाडकी मैत्रीण म्हणजे देविका. यात देविका हे पात्र अभिनेत्री राधिका देशपांडेने (Radhika Deshpande) साकारलं. मालिकेत तिची भूमिका कमी असली तरी तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या काळजात घर केलं. आजही अनेकजण या भूमिकेची आठवण काढताना दिसतात. तिच्या या भूमिकेचं कायमच कौतुक होत आलं आहे. अशातच नुकत्याच झालेल्या महिला दिनानिमित्त ‘देविका’ या पात्रावर आधारित कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि हीच कविता राधिकाने शेअर केली आहे.
राधिका देशपांडेनं पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?
अभिनेत्री राधिका देशपांडे (Radhika Deshpande) फक्त एक उत्तम अभिनेत्री नाही तर लेखिका, बालनाट्य दिग्दर्शक आहे. तसेच ती निवेदिका म्हणूनही काम करते. याशिवाय राधिका सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते. तिच्या कार्यक्रमांबद्दल महिती ती सोशल मीडियावरून शेअर करत असते. अशातच तिने शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. राधिकाने (radhika deshpande) इन्स्टाग्रामवर तिच्या देविका या भूमिकेची कविता शेअर केली आहे आणि असं म्हटलं आहे की, “साधारण ५०० एपिसोड्स झाले असतील, देविका अंदाजे १०० एपिसोड्स मधे दिसली आहे आणि राधिकेने शूट फार फार तर ५० दिवस केले आहे. मालिका सुरू झाली आणि देविका घराघरात पोहोचली.”
‘देविका’चा संदर्भ असलेली कविता
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “स्त्रियांच्या मनामनांत घर करायला तिला फारसा वेळ लागला नाही. परवा महिला दिनानिमित्त ‘देविका‘चा संदर्भ जोडत एक कविता WhatsApp to WhatsApp प्रवास करत करत माझ्या मोबाईलमध्ये पोहोचली. ‘देविका’ अशी हाक मारत एखाद्या बाईने मिठी मारणे, माझ्याजवळ रडणे, देविका माझ्या पण आयुष्यात ये ना… असे सातत्याने होत आले आहे. पण सोशल मीडियावर मी याबाबत मौन धरलं. स्मॉल स्क्रीन शॉर्ट मेमरी म्हणतात पण अजूनही मनातच नाही तर डोक्यात सुद्धा ती आहे. याचे मला आश्चर्य वाटले.”
राधिकाने प्रेक्षकांचे मानले आभार
यापुढे राधिकाने (Radhika Deshpande) पोस्टमध्ये असं म्हटलं, “इन मीन १०-१२ संवाद मला मिळायचे. स्क्रीन प्रेझेन्स ही फार नसे. देविका राधिकाला मिळाली आणि ती बोलू लागली. तिचं असणं, बोलणं प्रत्येक महिलेला हवं आहे. आज जास्त. ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे. माझ्यावर प्रेम करत राहिलात. माझी उणीव तुम्हाला भासत राहिली ही तुम्ही मला माझ्या कामाची दिलेली पावती आहे असं मी समजते. कलाकाराला आणिक काय हवं! राधिका आजही आहे. कोणीच जर नसेल तर अडीनडीला मला सांगा. एका महिलेसाठी मदतीचा हात मी यानिमित्ताने पुढे करते आहे. मायबाप रसिक प्रेक्षकहो, धन्यवाद”.