‘आई कुठे काय करते’ ही मालिका गेल्या चार वर्षांपासून छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवत आहे. टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका कायम पहिल्या पाच स्थानी असते. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी आपलंस केलं आहे. अरुंधती, संजना, अनघा, अनिरुद्ध, आशुतोष असे सगळेच कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. मालिकेत अनिरुद्ध-अरुंधती या दोघांचा घटस्फोट होऊन पुढे तो संजनाशी लग्न करतो असं दाखवण्यात आलं आहे. परंतु, खऱ्या आयुष्यात अनिरुद्ध-संजनाची भूमिका साकारणारे मिलिंद गवळी आणि रुपाली भोसले या दोघांमध्ये सेटवर मोठ्या प्रमाणात वाद होते. हे वाद जवळपास एक ते दीड वर्ष सुरू होते. हा किस्सा मिलिंद गवळींनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.
अभिनेते मिलिंद गवळी म्हणाले, “मालिकेत काम करत असताना दीड वर्ष आमच्यात मैत्री झालीच नाही. सहकलाकार तर लांब राहिलं आम्ही दोघं एकमेकांशी बोलतही नव्हतो. लॉकडाऊनमध्ये आम्ही ५० दिवस सिलवासाला होतो. तिथेही आमचे वाद सुरू होते. त्यावेळी मैत्री झालीच नाही. त्यानंतर आम्ही मुंबईला आल्यावर आमचे वाद एवढे वाढले की, एकमेकांबरोबर काम करणं कठीण झालं होतं. संजनाला घराघरांत लोक ओळखू लागले होते. पण, ऑफस्क्रीन आमचं काही केल्या पटेना. एकतर ती मालिकेत राहील किंवा मी अशी परिस्थिती निर्माण झाली. दोघे एकत्र काम करणं कठीणचं आहे इथपर्यंत भांडणं सुरू होती.”
हेही वाचा : “हसवतात, रडवतात अन्…”, अंकुश चौधरीने पहिल्याच दिवशी पाहिला ‘झिम्मा २’! शेअर केलेली पोस्ट चर्चेत
रुपाली भोसले म्हणाली, “आमच्या दोघांचे स्वभाव दोन टोकाचे होते. मी खूप वेळाने या मालिकेत आले. त्यामुळे तोपर्यंत या सगळ्यांचं सुंदर बॉण्डिंग तयार झालं होतं. त्यामध्ये मिळून मिसळून राहणं हे माझ्यासाठी खूप कठीण होतं. मला आठवतंय की, जेव्हा आमचं एकत्र पहिलं फोटोशूट झालं तेव्हा मी सरांना (मिलिंद गवळी) सांगितलं होतं की, हे बघा मी तुम्हाला दादा, मामा, काका, सर असं काही बोलणार नाही. मी तुम्हाला थेट मिलिंद अशी हाक मारेन कारण, तुम्ही माझ्या मैत्रीणीचे मित्र आहात. अशा झोनमध्ये मी होते. पण, प्रत्येक मालिकेच्या सेटवर कलाकारावर संस्कार होत असतात. तेव्हा मी सर्वांचं ऐकून हळुहळू त्यांना सर म्हणू लागले.”
दरम्यान, मिलिंद गवळी आणि रुपाली भोसले यांच्यातील वाद कालांतराने मिटले असून आता दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. याशिवाय मालिकेला सुद्धा प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.