प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक टप्पा येतो, ज्या क्षणी हतबल व्हायला होतं. सतत प्रयत्न करूनही म्हणावं तसं यश मिळत नसल्यामुळे सगळं आयुष्य संपवून घ्यावसं वाटतं. त्यामुळे अनेक जण आत्महत्येचा पर्याय निवडतात. पण या क्षणी योग्य मार्गदर्शक मिळाला तर ती व्यक्ती आत्महत्येपासून परावृत्त होते. असाच काहीसा प्रसंग ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री अश्विनी महांगडेने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे.
हेही वाचा – माधुरी दीक्षितच्या चित्रपटात झळकणार ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील ‘ही’ अभिनेत्री
अभिनेत्री अश्विनी महांगडेने ‘अजब गजब पोस्टकास्ट’ला नुकतीच मुलाखत दिली. त्यावेळीस तिने आत्महत्येचा प्रसंग सांगितला. ती म्हणाली, “आपण करिअर सुरू करताना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असं येतं की, आता सगळं संपलंय. किती वर्ष प्रयत्न करायचे आणि आयुष्यात सगळ्याला किती सामोर जायचं. मला जगायचंच नाहीये. मी गेले होते आत्महत्या करायला की, आता नाही जमणार.”
“मीरारोडला शिवार गार्डन एरिआ आहे. तिकडे तलाव आहे, मी तिथपर्यंत जाऊन बसले होते. नाना आले, माझ्या शेजारी बसले. मी रडत होते, खूप रडत होते. ते शांतपणे शेजारी बसले होते. मला शांत होऊ दिलं. मग त्यांनी डोक्यावर हात ठेवला. मला अजूनही रडू येतंय. त्यांनी एकच गोष्ट सांगितली, बघ परम्यातम्याने तुला काहीतरी सर्वोत्कृष्ट करायला इथे पाठवलं आहे. ते सर्वोत्कृष्ट अजूनपर्यंत तू केलेलं नाहियेस. मग तुझी सुटका कशी होणार इथून, ते सर्वोत्कृष्ट करण्यासाठी थांब आणि मी थांबले,” हा प्रसंग अश्विनीने सांगितला.
दरम्यान, अश्विनीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेपूर्वी ती ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘मेरे साई’ या मालिकांमध्ये पाहायला मिळाली होती. तसेच अश्विनी ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातही झळकली होती.