‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेली मालिका ‘आई कुठे काय करते’ ऑफ एअर होऊन अडीच महिने उलटून गेले आहेत. तरीही या मालिकेची चर्चा आणि मालिकेतील कलाकारांची चर्चा कायम रंगलेली असते. ‘आई कुठे काय करते’ मालिकेने पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. २०१९मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने ३० नोव्हेंबर २०२४रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार आता वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळत आहेत. सध्या या मालिकेतील अभिनेत्रींचे शेतामधले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या अभिनेत्री कोण आहेत? ओळखा पाहू.
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्रींचा शेतातील फोटो पाहून नेटकरी खूप कौतुक करत आहेत. “व्वा शेतकरी कन्या”, “खूपच कौतुक”, “खूप छान”, “शेतकऱ्यांच्या लेकी”, “मातीचे पाय…मातीतली माणसं”, “या जगात शेतकरी शिवाय पर्याय नाही, तू अभिनेत्री म्हणून चांगली आहेसच. पण, माणूस म्हणून पण खूप भारी आहेस, मराठी इंडस्ट्रीमधील तू एकच अशी अभिनेत्री आहेस जिचे पाय जमिनीवर आहेत”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये मागे असलेल्या अभिनेत्रीच्या एका हातात टोपली आणि दुसऱ्या हातात कुदळ दिसत आहे. तर दुसरी अभिनेत्री सेल्फी घेताना पाहायला मिळत आहे. तोंडावर ओढणी बांधून शेतात काम करणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अभिनेत्री अश्विनी महांगडे आणि कौमुदी वलोकर आहे. हातात टोपली, कुदळ घेऊन उभी असणारी अश्विनी असून सेल्फी काढणारी कौमुदी आहे.
अश्विनी महांगडेने इन्स्टाग्रामवर शेतातला फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे, “यावर्षी हळद काढायला खास माणूस आलेला…हळद खरंतर नानांना आवडणारी गोष्ट, म्हणून अजूनही आम्ही हळद करतो.”
दरम्यान, अश्विनी महांगडे आणि कौमुदी वलोकर दोघी जिवलग मैत्रीण आहेत. त्यामुळे दोघी नेहमी भेटत असतात. काही महिन्यांपूर्वी कौमुदीचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं. यावेळी अश्विनीने कौमुदीच्या संगीत सोहळ्यात खास डान्स केला होता. तसंच तिने कौमुदीला स्पेशल साडी भेटवस्तू म्हणून दिली होती.