‘आई कुठे काय करते’ मालिकेत झळकलेली आरोही म्हणजे अभिनेत्री कौमुदी वलोकर काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकली. कौमुदीचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. तिच्या लग्नसोहळ्याला ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. तसंच संगीत सोहळ्यात या कलाकारांनी कौमुदीसाठी खास परफॉर्मन्स केला. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहेत.
‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर कौमुदी वलोकरच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. २२ डिसेंबरला ग्रहमखपासून लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली. त्यानंतर मेहंदी, हळद, संगीत आणि सप्तपदी असे समारंभ पाहायला मिळाले. २७ डिसेंबरला कौमुदीने आकाश चौकसेशी लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ अजूनही चर्चेत आहेत. कौमुदीची खास मैत्री अभिनेत्री अश्विनी महांगडेने नुकताच संगीत सोहळ्यातला एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अश्विनीने लिहिलं आहे की, कौमुदी आणि आकाशचे संगीत…एका कलाकाराने एका कलाकाराला दिलेली एक छोटी भेट.
हेही वाचा – Bigg Boss 18: मुनव्वर फारुकीने रजत दलाल-करणवीर मेहराची उडवली खिल्ली, पाहा नवा प्रोमो
या व्हिडीओमध्ये, अश्विनी महांगडेचा सुंदर नृत्याविष्कार पाहायला मिळत आहे. तिने ‘नटरंग उभा’ या गाण्यावर खूप सुंदर सादरीकरण केलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांकडून कौतुक होतं आहे. “खूप सुंदर”, “एक नंबर”, “कमाल परफॉर्मन्स…बघताना अंगावर काटा आला”, “अप्रतिम” अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया अश्विनीचा परफॉर्मन्स पाहून उमटल्या आहेत.
दरम्यान, अश्विनी महांगडे आणि कौमुदी वलोकर खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. कौमुदीच्या प्रत्येक लग्नसमारंभात अश्विनी होती. ग्रहमखसाठी कौमुदीने खास अश्विनीने गिफ्ट म्हणून दिलेली साडी नेसली होती. अश्विनी महांगडेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर ती ‘धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर’ चित्रपटाचं डबिंग करताना दिसली. तसंच ती बऱ्याच सामाजिक कार्यात भाग घेताना पाहायला मिळत आहे.