अभिनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार, विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे अभिनय क्षेत्रातून पाच वर्ष ब्रेक घेणार असल्याचं त्यांनी स्वतः जाहीर केलं आहे. एका मुलाखतीमधून अमोल कोल्हेंनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याविषयी भाष्य केलं आहे. पण त्यांच्या या निर्णयावर ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री अश्विनी महांगडेने नाराजी व्यक्त केली आहे.
‘झी २४ तास’शी संवाद साधताना अभिनेत्री अश्विनी महांगडे म्हणाली, “मला खरंतर सहकलाकार म्हणून एकाअर्थी वाईट वाटतंय. आता पाच वर्ष त्यांच्याबरोबर काम करता येणार नाही. पण एक माणूस म्हणून खूप कौतुक वाटतंय. एक कलाकार असून सुद्धा कुठेतरी त्यांना माहितीये की, आता मला समाजासाठी, मला सगळ्यांसाठी वेळ देणं फार गरजेचं आहे किंवा जे पण काही प्रोजेक्ट आहेत, ते सगळे मार्गी लावणं मला फार गरजेचं आहे. एकीकडे हेही वाटतंय की, शिरुर मतदारसंघ फार नशीबवान आहे. असा माणूस त्यांना खासदार म्हणून लाभला आहे. पण दुसरीकडे कलाकार म्हणून वाईट वाटतंय. मात्र अशा विचारांचं खूप कौतुक वाटतंय आणि खरंच स्वतःला वाहून घेणाराच हा माणूस आहे.”
हेही वाचा – खासदार अमोल कोल्हेंचा अभिनय क्षेत्रातून ब्रेक! स्वतः खुलासा करत म्हणाले, “शिरुर मतदार संघातील…”
“जेव्हा एखादी जबाबदारी त्यांच्यावर येते ना तेव्हा ते स्वतःला झोकून देतात. आता आपण बघतोय नवं मतदार सुद्धा त्यांच्याकडे तुम्ही पुढे गेल्यानंतर हे हे प्रश्न मांडा, अशी यादी घेऊन येतात. आतापर्यंत आपण भारतात कुठे बघितलंय का नवं मतदारांनी कुठेतरी असे प्रश्न मांडण्यासाठी खासदाराकडे किंवा उमेदवाराकडे चिठ्ठी दिलीये म्हणून तर आता तरुण सुद्धा खूप जागे झालेत आणि ते त्यांच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतायत. आतापर्यंतचा तो प्रवास सगळ्यांचा कठीण होता. पण अमोल दादापर्यंत इतक्या सहजपणे पोहोचून प्रत्येक जण आपली मत मांडतोय. त्यांना काही गोष्टी सांगतोय, ही खरंच मोठी गोष्टी आहे. अभिमानाची गोष्ट आहे,” असं अश्विनी महांगडे म्हणाली.
दरम्यान, अश्विनी महांगडेने अमोल कोल्हेंबरोबर ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत अभिनेत्रीने राणूबाई जाधवांची भूमिका साकारली होती.