अभिनेत्री अश्विनी महांगडे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘आई कुठे काय करते’, या आणि अशा गाजलेल्या मालिकांतील भूमिकेसाठी ओळखली जाते. याबरोबरच ती सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती विविध सामाजिक विषयांवर भाष्य करताना दिसते. याबरोबरच अभिनेत्री राजकारणातदेखील सक्रिय आहे. २०२४ मध्ये अश्विनीने राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे. आता एका मुलाखतीत अभिनेत्रीने मुली सुरक्षित नसल्याचे वक्तव्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अश्विनी महांगडेने नुकतीच ‘मराठी मनोरंजन विश्व’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. सध्याची राजकारणाची जी परिस्थिती आहे, त्यामुळे तू यामध्ये पुढे काम करणार की नाही करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अभिनेत्रीने म्हटले, “राजकारणात काम करणं हा माझा निर्णय होता. कारण ते माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. ते स्वत: राजकारणात खूप सक्रिय असल्याने मी ते त्यांच्याकडूनच घेतलं आहे. राजकारण सोडण्याचा तर मुद्दाच येत नाही. पण, आताच संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं. अस्वस्थ व्हायला होतं. यावर मी व्यक्त होऊ की नको इतका त्रास ते फोटो, मुलगी बघितल्यानंतर होतो.

“आता तर असं झालंय की, कुठलाही पक्ष घेतला तर त्यातील सगळीच माणसं चांगली नाहीयेत. प्रत्येकाच्या हाताखाली कोणीतरी गुंड असेल आणि तो गुंड या सगळ्या माणसांवर दबाव आणत असेल, तर समाज म्हणून मी त्या समाजाचा हात कसा धरू आणि मी त्यांना त्या खड्ड्यातून बाहेर कशी काढू? कारण एक राजकारणात काम करणारी व्यक्ती म्हणून माझ्यावरही अनेक गोष्टींचा दबाव असूच शकतो. पण, माझ्यातली अश्विनीच मेली, तिला मारून टाकूनच मला राजकारणात काम करावं लागेल. तसं करायचं आहे का? तर तसं नाही करायचं. मी राजकारणात आलीये, कारण मला माझ्या सगळ्या माणसांची मदत करायची आहे. उद्या कोणालाही वाटलं की ताई आमच्या घरातील व्यक्तीला अमुक अमुक आजार झालेला आहे आणि मला पैशांची गरज आहे, तुम्ही काय करू शकता? माझं असं होतं की मी मदत करू शकते, पण मी आणखी दहा माणसांना सांगू शकते की तुम्ही मदत करा. म्हणजे काय तर माझ्या वैयक्तिक पातळीवर जे होतंय ते मी आता करणं महत्त्वाचे आहे. कारण आता महाराष्ट्रातली राजकारणाची परिस्थिती अशी आहे, ज्याचा मला भयंकर त्रास होणारी आहे. कलाकार म्हणून नाही तर राजकीय व्यक्ती म्हणूनच त्रास होणारी आहे. इतक्या खालच्या पातळीवर गेलेली आहे. आपल्या कोणाच्यातही तो दम नाहीये ही परिस्थिती आपण बदलू शकतो. भ्रष्टाचार, शिक्षण व्यवस्था अशा गोष्टी आहे.”

या मुलाखतीत मुली सुरक्षित नसल्याचे अभिनेत्रीने वक्तव्य केले. तिने म्हटले, “मला असं वाटतं की मी राजकारणात का आली आहे? कारण मला अमुक अमुक गोष्टींमध्ये बदल करायचे आहेत. आता मला कळतंय की या गोष्टीच बाजूला आहेत. मुलगीच सुरक्षित नाहीये. गेली कित्येक वर्षे मुली सुरक्षित नाहीयेत. म्हणजे हा प्रश्न आधी नव्हता का? आधीही होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावर तोडगा काढला. ज्याने कोणी मुलीवर अत्याचार केला त्याचा चौरंग करायचा. आता पोलिस यंत्रणा, कायदा आहे; तरीही तशीच अवस्था आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी जी अवस्था होती ती आता साडेतीनशे वर्षांनंतर असेल तर आपण आपल्याला २१ व्या शतकात घेऊन गेलोय की आपण त्याच्याही मागे आहोत?”

दरम्यान, अभिनेत्री नुकतीच आई कुठे काय करते या मालिकेत काम करताना दिसली होती.