‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे(Ashwini Mahangade) सातत्याने चर्चेत असलेली दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात असलेली दिसते. सोशल मीडियावर अनेकदा ती फोटो, रील शेअर करत असते. नुकतीच तिची सहकलाकार कौमुदी वलोकर लग्नबंधनात अडकली. तिच्या संगीत सोहळ्यात अश्विनीने केलेल्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अश्विनी व कौमुदी या दोघीही ‘आई कुठे काय करते’ मालिकेत दिसल्या होत्या. या दोन्ही अभिनेत्री अनेकदा एकमेकींविषयीच्या भावना व्यक्त करताना दिसतात. आता मात्र अभिनेत्रीने सोशल मीडियावर नवीन वर्षानिमित्त एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने नवीन वर्षाचे स्वागत कसे केले हे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने एक खास संदेश लिहिला. हा संदेश चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
काय म्हणाली अभिनेत्री?
अभिनेत्री अश्विनी महांगडेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री तिच्या कुटुंबाबरोबर पोपटी पार्टी करताना दिसत आहे. अश्विनी तिच्या कुटुंबासह नवीन वर्षाचे स्वागत करत आहे. अभिनेत्रीने या व्हिडीओला कॅप्शन देत लिहिले, “आनंद साजरा करायला कारण शोधायचे आणि तो क्षण आपल्या कुटुंबासोबत साजरा करायचा. सगळ्यात महत्त्वाचे हे की, आई-वडील आपल्या येण्याकडे डोळे लावून बसतात तर त्यांना वेळ द्या. इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा.” पुढे तिने २०२४ या वर्षाला धन्यवाद असे म्हणत २०२५ चे स्वागत केले आहे. शेवटी अभिनेत्रीने एक टीप लिहिली आहे ती अशी, “बापरे तुम्ही हे वर्ष साजरे करता, मग कसला मराठीचा आदर, असे प्रश्न पडत असतील तर पोस्ट पुढे ढकलून मोकळे व्हा.”
अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत अभिनेत्रीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “तुला व तुझ्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “टीप खूप आवडली”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा.”
दरम्यान, अश्विनी महांगडेच्या कामाबद्दल बोलायचे तर ती ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. अनघा असे तिच्या पात्राचे नाव होते. तिची ही भूमिका प्रेक्षकांना आवडली असल्याचे पाहायला मिळाले होते. या लोकप्रिय मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. याआधी अश्विनीने मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता अश्विनी महांगडे ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी अभिनेत्रीने स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत राणू आक्का ही भूमिका निभावली होती. तिच्या या ऐतिहासिक भूमिकेला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळाले होते.