स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही टीव्हीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने व यातील कलाकारांनी अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेप्रमाणेच त्यातील पात्रांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. या मालिकेत अनघा हे पात्र अभिनेत्री अश्विनी महांगडे साकारत आहे. अश्विनी महांगडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असून ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. तिने नुकताच एक व्हिडीओ शेअर केलाय आणि तो खूप व्हायरल होत आहे.
शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अश्विनी शेतात काम करताना दिसत आहे. ज्वारी काढण्याचं काम सुरू आहे आणि तिथे ती ज्वारीची कणसं मशिनमध्ये टाकून नंतर पोत्यात भरण्यास मदत करताना दिसत आहे. तिने या व्हिडीओबरोबर एक कॅप्शनही टाकलं आहे.
“रात दिस मेहनत करी, खाई कष्टाची भाकरी, पोसतो ही दुनिया सारी, माझा बाप शेतकरी.
जगाचा पोशिंदा : बळीराजा
कोणताच राजकारणी किंवा सिस्टम शेतकर्याला जगवत नसते तर शेतकरीच या सर्वांना जगवत असतो आणि हेच ऊन, वारा पावसासारखे शाश्वत सत्य आहे.
ईडा पिडा टळूदे आणि बळीचे राज्य येऊदे.
मी घातलेला शर्ट माझ्या वडीलांचा (नानांचा) आहे. नानांची मायेची ऊब, आम्हा सगळ्यांचे उन, वारा, पाऊस, आलेली संकटं यापासून कायम रक्षण केले त्याची जाणीव मनात कायम आहे,” असं कॅप्शन अश्विनीने हा व्हिडीओ शेअर करताना दिलंय.
‘आदर्श आहात ताई तुम्ही… त्या सर्वांसाठी, जे थोडीशी हवा लागताच आपली माती, आपली संस्कृती विसरतात… शेतकरी राजाला त्याचा हक्काचा मान,’ ‘ही असतात शेतकऱ्यांची पोरं/पोरी.. किती ही मोठे झाले तरी मातीशी नाळ कायम,” अशा प्रकारच्या कमेंट्स तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी केल्या आहेत.