Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Wedding : ‘आई कुठे काय करते’ मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील प्रत्येक पात्राने घराघरांत लोकप्रियता मिळवली होती. यामध्ये आरोहीची भूमिका अभिनेत्री कौमुदी वलोकरने साकारली होती. कौमुदी गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नसमारंभामुळे चर्चेत आहे. मालिकेतील जवळच्या मित्रमंडळींनी कौमुदीचं केळवण पारंपरिक पद्धतीने केलं होतं. यानंतर अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. ग्रहमख, मेहंदी, हळद, संगीत सोहळा पार पडल्यावर अखेर आता कौमुदीने आकाशबरोबर आपली साता जन्माची गाठ बांधली आहे.
लग्न लागतानाचे फोटो शेअर करत कौमुदीने ( Kaumudi Walokar ) त्यावर ‘साथ सात जन्माची’ असं कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्रीचा साखरपुडा गेल्या वर्षाच्या अखेरीस पार पडला होता. यानंतर कौमुदी विवाहबंधनात केव्हा अडकणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो क्षण आता आलेला आहे. कौमुदी आणि आकाश यांचा लग्नसोहळा थाटामाटात पडला आहे.
कौमुदी वलोकरचा लग्नात पारंपरिक लूक
कौमुदीचा पती आकाश चौकसे हा कलाविश्वापासून दूर आहे. तो उच्चशिक्षित असून एज्युकेशन विषयात त्याची पीएचडी पूर्ण झालेली आहे. संगीत सोहळ्याला आकाशने कौमुदीला हटके स्टाइलमध्ये प्रपोज करत पुन्हा एकदा लग्नाची मागणी घातली होती. या गोड जोडप्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्न लागताना कौमुदीने निळ्या रंगाची नऊवारी साडी, गुलाबी शेला अन् ब्लाऊज, पारंपरिक भरजरी दागिने, हातात हिरवा चुडा असा मराठमोळा लूक केला होता. तर, आकाशने ऑफ व्हाइट रंगाचा सदरा आणि त्यावर निळ्या रंगाचा शेला घेऊन आपल्या बायकोला ( Kaumudi Walokar ) मॅचिंग होईल असा लूक लग्नात केला होता.
कौमुदी ( Kaumudi Walokar ) आणि आकाश यांच्या लग्नाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. अश्विनी महांगडे, कृतिका देव, अभिषेक देशमुख ही कलाकार मंडळी अभिनेत्रीच्या लग्नसोहळ्याला उपस्थित होती. सध्या संपूर्ण मराठी कलाविश्वातून कौमुदीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.