काही दिवसांपासून ‘आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karte) ही मालिका आणि या मालिकेत काम करणारे कलाकार हे मोठ्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. पाच वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत असलेली ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या निमित्ताने मालिकेतील कलाकार सोशल मीडिया, मुलाखती या माध्यमांतून व्यक्त होताना दिसत आहे. आता या मालिकेतील सर्वांचे लाडके अप्पा म्हणजे अभिनेते किशोर महाबोले यांनी एका मुलाखतीत मालिकेविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. मालिका संपल्यानंतर कोणत्या गोष्टींची आठवण येईल, याबद्दल त्यांनी वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले किशोर महाबोले?

अभिनेते किशोर महाबोले यांनी नुकताच ‘अल्ट्रा मराठी बझ’ या यूट्यूब चॅनेलबरोबर संवाद साधला आहे. यावेळी त्यांना विचारण्यात आले की, तुमचे सेटवर कोणाशी खास नाते, बॉण्ड तयार झाला आहे? यावर बोलताना त्यांनी म्हटले, “माझा स्पेशल बॉण्ड असा काही नाहीये. माझं सगळ्यांशी बॉण्डिंग आहे.”

मालिकेला भरभरून प्रेम दिल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानत किशोर महाबोले यांनी म्हटले, “सीरियल सुरू झाली की, ती कधीतरी संपणारच असते. हे नक्की असतं. पण, पाच वर्षांचा प्रवास आठवणीत राहतो. पाच वर्षं म्हणजे हा कमी प्रवास नाहीये. त्यामुळे आम्ही सगळे कलाकार कुटुंबापेक्षा जास्त वेळ सेटवर घालवत होतो. एक कलावंत म्हणून या भूमिकेनं मला खूप समाधान दिलं. जिथे जातो तिथे आप्पा, अशीच माझी ओळख आहे. सगळे मला आप्पा म्हणून हाक मारतात. बरं वाटतं. ऐकायलाही बरं वाटतं. काही जण भेटतात, पाया पडतात आणि महिलांमधून एकच आवाज येत असतो की, असं व्यक्तिमत्त्व प्रत्येक घरात असायला हवं आणि हेच माझ्यासाठी सीरियलचं यश आहे. काही दिवस राहिलेले आहत. खरं तर खूप आठवणी दाटून येतात; पण त्याला इलाज नाही. हे सगळं बरोबर घ्यायचं असतं आणि पुढे जायचं असतं. असो! पण बऱ्याचशा आठवणी राहणार आहेत. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मिससुद्धा होणार आहेत. कांचन व अप्पांची केमिस्ट्री, अरुंधतीचं गाणं, अरुंधती व अप्पांचे, यश व अप्पांचे सीन मिस होणार आहेत. पीटर व यशगंधार यांचे सीन मी मिस करतोय. छान वाटत होतं. मजा येत होती, आम्ही सगळे हसत-खेळत सीन करायचो”, अशा शब्दांत किशोर महाबोले यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: ऐश्वर्या नारकर यांच्या सौंदर्याचं आणि फिटनेसचं रहस्य काय? व्हिडीओ शेअर करत स्वत: दिली माहिती

किशोर महाबोले यांनी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनिरुद्धच्या वडिलांची भूमिका निभावली होती. अप्पा अशी त्यांच्या पात्राची ओळख होती. त्यांनी कायम अरुंधतीला तिच्या चांगल्या-वाईट काळात साथ दिल्याचे मालिकेत पाहायला मिळाले. त्यामुळे या पात्राला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.