‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखलेने सोशल मीडियावर पोस्ट एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका नव्या भूमिकेची तयारी करताना दिसून येत आहे. या सगळ्याबाबत काय म्हणते मधुराणी हे जाणून घेऊयात…
मधुराणीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ती एका भूमिकेत झळकणार आहे. हा व्हिडीओ शूटिंगदरम्यान मेकअप करत असतानाचा आहे. या व्हिडीओमध्ये मधुराणीने हातात स्क्रीप्ट घेतली आहे. कपाळावर भलं मोठं कुंकू, केसांचा अंबाडा, गळ्यात काळे मणी आणि चेहऱ्यावर गोंदण असा हा तिचा नवा लूक समोर येत आहे. “वेगळं काही करून बघायला नेहमीच मजा येते…” असं तिने कॅप्शन दिलंय. अरुंधतीच्या भूमिकेनंतर मधुराणी आता कोणत्या नव्या भूमिकेत दिसणार आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा- सावनीचा डाव मुक्ता उधळून लावणार? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या महाएपिसोडमध्ये नेमकं काय घडणार? वाचा…
या व्हिडीओबरोबरच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरीमध्येदेखील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये शूटिंगचा सेट ग्रामीण भागातला असल्याचं दिसत आहे. मधुराणीने गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली असून हातात एक टोपली घेतली आहे. यावरून ती लवकरच नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, असं दिसतंय. नऊवारी साडीतला हा व्हिडीओ तिने स्टोरीला पोस्ट करत दिग्दर्शक नितीश पाटणकर यांना टॅग केला आहे. या व्हिडीओवर तिने हॅशटॅग देत ‘नवीन प्रोजेक्ट’ असा उल्लेख केला आहे.
मधुराणीने साकारलेल्या ‘अरुंधती’ या व्यक्तिरेखेला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. तिचा हा नवीन लूक पाहिल्यावर काहींनी तिला तिच्या नव्या भूमिकेबद्दल विचारलं, तर काहींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मधुराणीची नवीन भूमिका नेमकी कशातली आहे? तिचा हा नवा प्रोजेक्ट नेमका कशा संदर्भात आहे, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील तिच्या या भूमिकेने घरातील प्रत्येक गृहिणीचं मन जिंकून घेतलं. कधी हळवी तर कधी खंबीरपणे उभी राहणाऱ्या या अरुंधतीला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. आता नव्या प्रोजेक्टसाठी ती मालिका सोडणार आहे का, याबाबत प्रेक्षकांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – Bigg Boss Marathi : कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये डाव पलटला, ‘बिग बॉस’ने घेतला धक्कादायक निर्णय, पाहा नवा प्रोमो
मधुराणीबद्दल सांगायचं झालंच तर, ती अभिनेत्री असण्याबरोबरच कवयित्रीदेखील आहे. मधुराणीने सादर केलेल्या कवितांच्या अभिवाचनाला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत असतं. त्याचबरोबर खऱ्या आयुष्यातही गायिका असलेल्या मधुराणीने मालिकेतही अनेक गाणी गायली आहेत.