‘स्टार प्रवाह’च्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेने पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. २०१९पासून सुरू झालेल्या या मालिकेने लोकप्रियतेची एक वेगळीच उंची गाठली. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. मग ती नायिका असो किंवा खलनायिका. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती ही महिलासाठी आयडॉल झाली. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने अरुंधती उत्कृष्टरित्या साकारली. त्यामुळे अजूनही अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करून आहे. लवकरच मधुराणी पुन्हा एकदा ‘स्टार प्रवाह’वर पाहायला मिळणार आहे. याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नवा कुकिंग शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘शिट्टी वाजली रे’ असं या नव्या शोचं नाव आहे. अभिनेता अमेय वाघवर या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी देण्यात आली आहे. ‘शिट्टी वाजली रे’ मध्ये कलाकारांच्या जोड्या स्वयंपाक करण्याबरोबर प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत. या शोमध्ये पुष्कर श्रोत्री, निक्की तांबोळी, घनःश्याम दरवडे, गौतमी पाटील, रुपाली भोसले, विनायक माळी, धनंजय पोवार, स्मिता गोंदकर, अशिष पाटील, माधुरी पवार असे बरेच कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. तसंच यांच्याबरोबर मधुराणी प्रुभलकर देखील झळकणार आहे.
‘शिट्टी वाजली रे’ या शोचा नवा प्रोमो ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मधुराणी प्रभुलकर लाल रंगाच्या साडीत ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. तिच्याबरोबर रुपाली भोसले पाहायला मिळत आहे. दोघी मिळून स्वयंपाक करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे मधुराणीला पुन्हा एकदा ‘स्टार प्रवाह’वर पाहता येणार आहे.
दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिका ३० नोव्हेंबर २०२४ रोजी संपली. त्यानंतर काही महिन्यात मधुराणीची ‘स्टार प्रवाह’वर पुन्हा एन्ट्री झाली. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत ती झळकली. या मालिकेतील स्वीटी आणि मकरंदच्या लग्नात मधुराणी खास पाहुणी म्हणून उपस्थित राहिली होती.
‘शिट्ट वाजली रे’ शो कधीपासून सुरू होणार?
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘शिट्टी वाजली रे’ हा नवी कुकिंग शो २६ एप्रिलपासून सुरू होणार आहे. शनिवार, रविवार रात्री ९ वाजता हा शो पाहायला मिळणार आहे. सध्या या वेळेत ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ सुरू आहे. पण, आता लवकरच धिंगाणाचं हे पर्व प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.