‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘आई कुठे काय करते’. या मालिकेने गेली पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. २०१९पासून सुरू झालेल्या या मालिकेचा प्रवास ३० नोव्हेंबर २०२४ रोजी संपला. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि महिलांची आयडॉल झालेली अरुंधती म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्याची ‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय मालिका ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’मध्ये झळकणार आहे. या मालिकेत आता स्वीटी आणि मकरंदच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. या दोघांच्या लग्नात अरुंधती खास हजेरी लावली आहे. नुकताच ‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये मधुराणी प्रभुलकर म्हणाली, “हाय, नमस्कार. तुम्ही सगळे विचारत करत असाल की, आई इथे काय करतेय? आई आज स्वीटी आणि मकरंदच्या लग्नाला आलीये. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’च्या सेटवरती मला खूप मजा येतेय. जवळपास एक-दीड महिना आमचं शूटिंग संपून झालं. शूटिंग, कॅमेरा, रोल, अ‍ॅक्शन, कट, चला…चला लवकर चला, हे सगळे शब्द, हातात स्क्रिप्ट घेणे, या सगळ्यांची खूप आठवण येत होती. आज यानिमित्ताने पुन्हा एकदा शूटिंगच्या माहोलमध्ये आलीये. फार गोड माणसं आहेत, निवेदिता ताई, मंगेश सर. तेव्हा नक्की बघा, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’. या मालिकेमध्ये आता लग्नाचा सिक्वल सुरू आहे. आम्ही सगळे उपस्थित राहिलो आहोत. हळूहळू प्रत्येक मालिकेतील मंडळी येतायत. त्यामुळे मालिकेत नेमकं काय होणार आहे? हे पाहण्यासाठी तुमची उत्कंठा वाढणार आहे. एक आई दुसऱ्या आईला कसा पाठिंबा देणार? हे तुम्ही नक्की बघा,” असं मधुराणी प्रभुलकर म्हणाली.

दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीप्रमाणे इतर भूमिका देखील घराघरात पोहोचल्या. अनिरुद्ध, संजना, यश, ईशा, अभिषेक, अनिश, आप्पा, कांचन देशमुख, शंतून, विशाखा, आशिष या व्यक्तिरेखांनी सुद्धा प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. तसंच मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांचा चांगलाच खिळवून ठेवलं. त्यामुळे मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. सर्वाधिक टीआरपी ‘आई कुठे काय करते’ मालिकेला मिळत होता. पण कालांतराने मालिकेतील सातत्याने बदलणारे ट्रॅक प्रेक्षकांना प्रचंड रंटाळवाणे वाटले. त्यामुळे प्रेक्षक ‘आई कुठे काय करते’ मालिका बंद करण्याची मागणी करत होते. याचवेळीस मालिकेची वेळ बदलण्यात आली. अखेर ३० नोव्हेंबरला ‘आई कुठे काय करते’ मालिकेचा शेवट झाला.

Story img Loader