स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेत आईचे पात्र साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही कायमच चर्चेत असते. मात्र आता मधुराणी प्रभुलकर ही एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मधुराणी प्रभुलकर हिचे पती प्रमोद प्रभुलकर यांची फसवणूक झाली आहे. ऑनलाईन माध्यमातून हॉटेल बुकींग करताना ही फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकरचे पती दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर हे दिवाळीच्या सुट्टीत फिरण्यासाठी गणपतीपुळे या ठिकाणी गेले होते. त्यावेळी त्यांनी रत्नागिरीतील गणपतीपुळे येथील ग्रीनलीफ रिसोर्ट हॉटेल या ठिकाणी दोन दिवसांसाठी १७ हजार रुपये देऊन त्यांनी या रिसॉर्टचे बुकींग केले होते. मात्र तिथे गेल्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आलं आहे. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रमोद प्रभुलकर यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनुसार, ग्रीनलीफ रिसॉर्टमध्ये बुकींग केल्यानंतर मधुराणी प्रभुलकर आणि तिचे पती त्या ठिकाणी राहण्यासाठी गेले होते. मात्र तिकडे गेल्यानंतर त्यांच्या नावाने कोणतीही बुकींग झाली नसल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी हॉटेलच्या मॅनेजमेंटकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप प्रमोद प्रभुलकर यांनी केला आहे.
आणखी वाचा : “आधी धमकावले, नंतर अंधारात गाडी उभी केली आणि…” उबरमध्ये अभिनेत्री मनवा नाईकबरोबर घडला धक्कादायक प्रसंग
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीतील गणपतीपुळे येथील ग्रीनलीफ रिसोर्ट हॉटेलमध्ये लोकांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर येत होत्या. त्यात आता अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांचे पती प्रमोद प्रभुलकर यांची फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. ही फसवणूक हॉटेल व्यवस्थापनाकडून झालेली नसल्याचे सांगितले जात आहे. काही उत्तर भारतीय व्यक्तींनी हॉटेलची साईट हॅक केल्याचे सांगितले जात आहे.
मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. प्रभूलकर यांच्याबरोबर आणखी एका व्यक्तीची १ लाख ६० हजारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली की नाही याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच प्रभुलकर कुटुंबियांकडून किंवा हॉटेल व्यवस्थापनाकडून याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.