‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर नेहमी चर्चेत असते. गेल्या साडे चार वर्षांहून अधिक काळापासून मधुराणी प्रेक्षकांच्या मनावर अरुंधती म्हणून अधिराज्य गाजवत आहे. आता अरुंधती या भूमिकेद्वारेच मधुराणीला ओळखलं जात आहे. अशा या लोकप्रिय मधुराणी प्रभुलकरने नुकतंच तिच्या वडिलांच्या व्यवसायाच्या ठिकाणी सुंदर फोटोशूट केलं. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.
लाल रंगाचं कलमकारी डिझाइन असलेलं ब्लाऊज, त्यावर लेव्हंडर रंगाची साडी आणि केसात गुलाब असा मनमोहक लूक करून मधुराणी प्रभुलकरने तिच्या वडिलांच्या व्यवसायाच्या ठिकाणी फोटोशूट केलं. या फोटोंमध्ये मधुराणीच्या सुंदर अदाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
मधुराणीने हे फोटो शेअर करत लिहिलं, “एक छान वेगळं फोटोशूट करायचं बरेच दिवस मनात होतं आणि अचानक ही सगळी टीम जुळून आली…या उत्साही आणि क्रिएटिव्ह गँगचे कौतुक करावं तेवढं कमीच आणि ठिकाण आहे…पुण्यातील भाजी मंडई…माझ्या वडिलांचं व्यवसायाचं ठिकाण… तुळशीबागेत माझं बालपण गेलं त्यामुळे मंडई हा बालपणीचा महत्वाचा भाग…सकाळसकाळी भाजी लागत असताना केलेलं हे शूट कायम लक्षात राहील…”
मधुराणीचा या मनमोहक लूकवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री पल्लवी पाटील, सलील कुलकर्णी, कुशल बद्रिके, अश्विनी कासार अशा अनेक कलाकारांनी तिच्या लूकचं कौतुक केलं आहे. तसंच “तुझ्या वयाचा प्रवास उलट्या दिशेने सुरू आहे बहुतेक. तू दिवसेंदिवस तरुण दिसत आहेस”, “तू विद्या बालनसारखी दिसतेस”, “लय खतरनाक”, “मादक अदा”, “ड्रीम गर्ल”, “व्वा छान”, “तू खूपच सुंदर दिसतेय”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, ‘आई कुठे काय करते’बद्दल बोलायचं झालं तर, लवकरच मालिकेत अभिनेत्री ऋषी सक्सेनाची एन्ट्री होणार आहे. मिहीर शर्मा या व्यक्तिरेखेत तो पाहायला मिळणार आहे. मिहीर शर्मा हा उत्तम शेफ असतो. त्याची आई अरुंधतीची खूप मोठी चाहती होती. आपल्या मुलाने अरुंधतीकडून गाणं शिकावं ही तिची इच्छा होती. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मिहीर अरुंधतीकडून गाण्याचे धडे गिरवणार आहे.