Valentine’s Day 2025: फेब्रुवारी महिना सुरू होताच प्रेमी युगलांना वेध लागतात व्हॅलेंटाईन डेचे. ७ फेब्रुवारीपासून सुरू झालेला हा व्हॅलेंटाईन वीक १४ फेब्रुवारीला संपतो. रोझ डे, प्रपोज डे असे सर्व डे साजरे करून झाल्यानंतर १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी युगल आपल्या प्रियजनांसाठी खास प्लॅन करून प्रेम व्यक्त करत असतात. आज व्हॅलेंटाइन डे कलाकार मंडळीदेखील साजरा करताना दिसत आहेत. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने व्हॅलेंटाइन डेनिमित्ताने खास कविता सादर केली आहे; ज्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘आई कुठे काय करते.’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर पाच वर्ष अधिराज्य गाजवलं आणि ३० नोव्हेंबर २०२४ला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. या मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने अरुंधती ही मध्यवर्ती भूमिका उत्कृष्टरित्या साकारली. त्यामुळेच अरुंधती महिलांसाठी आयडॉल झाली. तसंच मधुराणीला अजूनही अरुंधती म्हणून अधिक ओळखलं जात. आज मधुराणीने व्हॅलेंटाइन डे निमित्ताने कवी सुधीर मोघे यांची कविता सादर केली.
मधुराणी प्रभुलकरने सादर केलेली कविता
दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित सोनेरी ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं
शोधून कधी सापडत नाही
मागून कधीच मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणून टळत नाही
आकाश, पाणी, तारे-वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षांच्या विटलेल्या मनाला
आवेगांचे तुरे फुटतात
संभ्रम, स्वप्नं, तळमळ-सांत्वन
किती किती तर्हा असतात
सारय़ा सारख्याच जीवघेण्या
आणि खोल जिव्हारी ठसतात
प्रेमाच्या सफ़ल-विफ़लतेला
खरतरं काहीच महत्व नसतं
इथल्या जय-पराजयात
एकच गहिरं सार्थक असतं
मात्र ते भोगण्यासाठी
एक उसळणारं मन लागतं
खुळ्या सोनेरी उन्हासारखं
आयुष्यात प्रेम यावं लागतं
- कवी सुधीर मोघे
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मधुराणी प्रभुलकर ‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय मालिका ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’मध्ये झळकली होती. स्वीटी आणि मकरंदच्या लग्नानिमित्ताने मधुराणीची या मालिकेत एन्ट्री झाली होती. याबाबत मधुराणी म्हणाली होती की, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’च्या सेटवरती मला खूप मजा आली. जवळपास एक-दीड महिना आमचं शूटिंग संपून झालं. शूटिंग, कॅमेरा, रोल, अॅक्शन, कट, चला…चला लवकर चला, हे सगळे शब्द, हातात स्क्रिप्ट घेणं, या सगळ्यांची खूप आठवण येत होती. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेतील निवेदिता ताई, मंगेश सर हे सर्व फार गोड माणसं आहेत.